मी आणि माझे धार्मिक लेखन

      नव्या प्रकाशाच्या प्राप्‍तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसला, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते. जगातील व्यथा आणि दु:ख ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे असे त्यांनी मान्य केले.  परंतू दु:ख कसे नाहिसे करावे ह्या प्रश्‍नाचा  विचार सांख्य तत्वज्ञानाने केला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्‍नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्‍न विचारला की, “व्यक्‍तिमात्राला भोगाव्या लागणार्‍या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ?” त्यांचा दुसरा प्रश्‍न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ?” या दोन्हिही प्रश्‍नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्‍त कसे व्हायचे याचा शोध फ़क्‍त बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हा चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.

      भगवान बुध्दांच्या काळात अनेक मतप्रणाली अस्तित्वात होत्या. ह्या मतप्रणाली साधारणत: दोन भागात विभागल्या जातात. एक उच्छेदवादी व दुसरे शाश्वतवादी. सर्व काही संपणारे आहे म्हणून खा, प्या आणि मजा करा अशी उच्छेदवादी विचारसरणी होती. आत्मा शाश्वत आहे म्हणून हे माझे, ते माझे असे शाश्वतवादी विचारसरणी होती. भगवान बुध्दांनी या दोन्हिही विचारसरणीला नाकारले.

भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक यांना सारनाथ येथे धम्माचा  उपदेश केला व त्यानंतर त्यांचा धम्म संपुर्ण जगात पसरला.

      भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, ‘जीवनाच्या आत्यंतिक असे दोन टोके म्हणजे खा, प्या आणि मजा करा, आणि सर्व वासना मारुन टाका. कारण ते पुनर्जन्माचे मुळ आहेत.’ यां दोन्हिंही टोकांना  नाकारुन जो उपभोगाचा नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही असा मध्यम मार्ग त्यांनी स्विकारला. याच मध्यम मार्गाची शिकवण भगवान बुध्दांनी दिली. तेव्हा हे मध्यम मार्ग दुसरे-तिसरे काही नसून चार आर्यसत्यच आहेत. हाच मार्ग मानव मुक्‍तीचा आहे. इश्वर, आत्मा वगैरे काल्पनिक गोष्टीला स्थान न देता त्यांनी ‘माणूस आणि माणसाचे या जगातील नाते’ याला प्राध्यांन्य देऊन आपला धम्म सांगितला. म्हणूनच त्यांच्या धम्माला       ‘एहि पस्सिको’ म्हणजे ‘या आणि प्रत्यक्ष पाहा‘ असे म्हटले आहे.

      याच सुत्तात ते पुढे म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरनोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनूष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.

      जगातील सर्व प्राणी दु:खाने पिडलेले आहेत. कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने ते दु:खी झालेले असतात. मनाच्या विरुध्द कुठली गोष्ट घडली की झाला दु:खी ! सर्व संसार दु:खाच्या समुद्रात गटांगळ्या खात आहेत. जेथे जेथे जीवन आहे तेथे तेथे दु:खही दु:ख भरलेले आहे.

      केवळ मनुष्यप्राण्याच्या बाबतीत जरी विचार केला तरी माणसां-माणसात झगडा, कलह, भांडण, वाद-विवाद अशा गोष्टींचा जिकडे तिकडे बोलबोला दिसून येईल. जिकडे तिकडे आतंकवाद, फुटिरतावाद, वर्णवाद, वर्गवाद, जातीवाद, धर्म-पंथवाद, भाषावाद, प्रांतवाद, राष्ट्रवाद अशा गोष्टी बोकाळलेल्या दिसतील. जिकडे तिकडे चोरी, लुटमार, फसवणुक, हिंसाचार, भ्रष्टाचार, खोटेपणा याच गोष्टींचा भरमार दिसून येईल.

       लोकं कोणत्या ना कोणत्या तरी भितीने ग्रस्त  झालेला असतो… थंडी वाढली तरी भिती… गरमी वाढली तरी भिती… खुप पाऊस पडला तरी भिती… कमी पाऊस पडला तरी भिती… कुणाला भुकेची-तहानेची भिती… कुणाला रोगराई, बिमारी, मरणाची भिती… कुणाला म्हातारपणाची भिती… कोणी तलवार, चाकु बंदुका काढल्या की भिती…कोणी चोरी, लुटमार करेल कां म्हणून भिती… कुणाला लढाई ची भिती… बॉंबस्फोटात मरण्याची, जखमी होण्याची भिती… आगिची, अपघाताची भिती…. दहशतवादी, नक्षलवादी लोकांची भिती…भितीच भिती…जो तो भितीने पछाडलेला असतो. याचे पर्यवसान त्याला दु:ख निर्माण करण्यात होत असते. 

      कोणी भुकेने तडपतो आहे. कोणी तहानेने व्याकुळ होतो. कुणाकडे शरीर झाकण्याकरीता पुरेसे  वस्त्र नाहीत. कुणाला ऊण, वारा, पावसापासून वाचण्यासाठी आच्छादन नाही. कोणाकडे दवाई-पाणी घेण्याकरीता पुरेसे पैसे नहीत. कोणी आपल्या मुला-बाळांना शिकवू शकत नाही. कोणी गरिबीपूढे हात टेकले आहेत. कोणाकडे पैसा असुनही मानसीक समाधान नाही. म्हणजेच  दु:खाला पारावार नाही !

      कुठे पती व पत्‍नीमध्ये भांडण, कुठे वडील व मुलांमध्ये भांडण, कुठे आई व मुलामध्ये भांडण, कुठे मुलां-मुलांमध्ये  भांडण, कुठे सासु व सुनांमध्ये भांडण, कुठे शेजार्‍यां-पाजार्‍यांशी भाडण, कुठे मोहल्या-मोहल्यात, गावां-गावां भांडण.  कुठे जाती-जातींमध्ये भांडण. कुठे धन-संपत्तीसाठी भांडण, कुठे जमिन-जुमल्यासाठी, कुठे मानसन्मानासाठी भांडण, कुठे हुंड्यासाठी भांडण. भांडणाला काही अंत नाही. पुढे हे भांडण विकोपाला जावून मारामारी, खुन, जाळपोळ, हिंसाचार इत्यादी प्रकार घडतात. मग हे प्रकरण पोलीसांपर्यंत, कोर्टापर्यंत जाते. त्याची परिणीती म्हणजे मानहानी व पैश्याची नासाडी… कोर्टाच्या निकालानंतर तुरुंगवास अथवा फाशीची शिक्षा… म्हणजेच भांडणाचा शेवट हा दु;खांमध्येच परिवर्तीत होते.

      कोणी आपल्याला हिंदु म्हणोत, बौध्द म्हणोत, ख्रिचन म्हणोत, शिख म्हणोत, जैन म्हणोत अथवा कोणी मुसलमान म्हणोत. कोणीही या दु:खापासून मुक्त नाही. कोणताही मनुष्य मग तो गरिब असो की श्रिमंत, गृहस्थी असो की गृहत्यागी-सन्यासी, अशिक्षित असो की सुशिक्षित , राजा असो की रंक अशा सर्वांनाच दु:खापासून सुटका नाही.

      हे दु:ख काय आहे ? या दु:खामागील कारणे कय आहेत ? या दु:खाला लोकं वारंवार बळी कां पडतात. या दु:खाचे निवारण करणे शक्य आहे काय ? जर असेल तर त्याचे उपाय काय आहेत ? दु:ख निर्माण होण्यापुर्विच त्या मागिल कारणाला रोखणे शक्य आहे काय ? इत्यादी अनेक प्रश्‍न सर्वांनाच पडते. कित्येकांनी त्याचा शोध घेऊन पाहिला असेलही ! कित्येकांनी याच्या मागे देव, ईश्वर, परमात्मा यासारखे शक्ती असल्याचे कारणे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकून टाकली आहे. . त्यासाठी त्यांनी देवपुजा, देवभक्ती, आहुती देणे, नैवद्य देणे, बळी देणे, लाच देणे, इत्यादी दु:खमुक्तीचे अगदी सोपे उपाय सांगितले आहेत. जीवनात केलेल्या दुष्कृत्याच्या पापाची डागे गंगा, गोदावरी सारख्या  तथाकथीत पवित्र नदीमध्ये व कुंभमेळ्यामधे स्नान करुन  धुवून काढता येते अशी शिकवण धर्मभोळे लोकांना सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दाने मात्र याचा शोध शास्त्रिय व वैज्ञानीक दृष्टिकोनातून घेतला आहे. दु:ख, दु:ख निर्मिती, त्याची कारणे, त्यावर उपाय इत्यादी सर्व बाबींचा सखोलपणे अभ्यास करुन त्यानी सविस्तर अशी मांडणी केली आहे.   

      भगवान बुध्दांचा प्रथम धम्मचक्र प्रवर्तनापासून तर आतापर्यंत आणि भविष्यात सुध्दा जे कोणी धम्म सांगतील ते दुसरे-तिसरे काही राहणार नसून ते चार आर्यसत्याचाच सार राहील असे ठामपणे म्हणावे लागेल. भगवान बुध्दांने याला उत्तम शरण असे म्हटले आहे.

            भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेएकान्नव व एकशेब्यान्नवव्या गाथेत म्हणतात –

      दु:ख दुक्खसमुप्पादं दुक्खस्स च अतिक्क्मं ।

      अरियञ्चग्ङिकं मग्गं दुक्खूपसगामिनं ॥

      एतं खो सरणं  खेमं एतं सरण्मुत्तमं ।

      एतं सरणमागम्म सब्बदुक्खा पमुच्चति ॥

      याचा अर्थ, जो चार आर्यसत्यांना योग्य प्रकारे प्रज्ञेने पाहतो व  दु:ख, दु:खाची उत्पत्ती, दु:खाचा विनाश व दु;खाचे उपशमन करणारा आर्य अष्टांगिक मार्ग याचे शरण ग्रहण करणे हेच कल्याणकारी आहे, हेच उत्तम शरण आहे. या शरणाला ग्रहण करुन मनुष्य सर्व दु:खातून मुक्त होतो. परंतु यासाठी तुम्हीच प्रयत्‍न केले पाहिजे असे भगवान बुध्द म्हणतात-

      तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता ।

      याचा अर्थ, तुम्हीच प्रयत्‍न केले पाहिजे. तथागत केवळ मार्गदाता आहे.

      म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या ‘बुध्दांने कोणते बदल केले?’ यां भागात  ‘कार्यकारणभावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसुध्दांत भगवान बुध्दांनी मान्य केले.’ असे लिहिले आहे. कार्यकारणभावाचा म्हणजेच प्रतित्यसमुत्पादाचा हाच सिध्दांत म्हणजे चार आर्यसत्याचा अविष्कार होय. म्हणूनच दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्ये समजणे म्हणजेच भगवान बुध्दांचा धम्म समजणे असे म्हटल्या जाते.

      तथापी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्‍न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्‍नात ते म्हणतात की, “चार आर्यसत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे ? कारण हे चार आर्यसत्य बुध्दाच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.”

      त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय ? या प्रश्‍नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे  असे पहिल्या आर्यसत्यात  भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ?” भगवान बुध्दाच्या बाबतीत असा दृष्टिकोन बाळगणे चुकीचे आहे.

      भगवान बुध्द जरी दु:खाचे अस्तित्व मान्य करीत असले तरी ते दुसर्‍या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. दु:खाचे निरसन करण्याचा मार्ग सुध्दा त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे, असे कसे म्हणता येईल ? भगवान बुध्दाच्या धम्मात मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे.

      जग आणि जीवन दु:खमय नाही तर जगात आणि जीवनात दु:ख आहे असा नवा विचार त्यांनी मांडला. या दु:खावर मात करता येते असे त्यांनी ठासून सांगितले. या दु:खावर मात करण्याचा उपायही त्यांनी सांगितला.

      भगवान बुध्दाने सतत आयुष्याच्या अखेरपर्यंत सतत भ्रमण करुन विपश्यना विद्येच्या माध्यमातून लोकांना दु:खमुक्तीचा मार्ग सांगितला. परिनामस्वरुपत: त्यांच्या जीवनकाळामध्ये हजारो गृहत्याग करणार्‍या भिक्खु आणि भिक्खुंनी अरहंत झालेत, निर्वाणपदा पोहचवून पुर्णत: दु;ख मुक्त झालेत.  तसेच अन्य भिक्खु आणि भिक्खुंनीसहित लाखोच्या संख्येत गृहास्थी जीवन जगणारे लोकं सुध्दा सत्याचा साक्षात्कार होऊन स्त्रोतापन्न झालेत. दु:ख मुक्त झालेत. भगवान बुध्दाचा विपश्यना मार्ग या चार आर्यसत्याचा आधार घेऊन जगातील करोडो लोकांचे कल्याणाचा मार्ग प्रशस्त करुन याच जीवनामध्ये प्रत्यक्ष दु:ख-विमुक्तीचा अनुभव करुन देत आहेत.

      विपश्यना शिबीरामध्ये चित्ताला निर्मळ करुन शेवटच्या दिवशी मंगल मैत्रीचा अभ्यास केला जात असतो. ‘भवंतु सब्ब मंगलं’ चा मंगलकारी घोषाने संपुर्ण आसमंतात मंगल-घोषाचे तरंगच-तरंग जिकडे-तिकडे पसरत असतात

      कोणी एखादा निष्णात डॉक्टर रोग्यांना सांगतो की, तुला अमुक रोग झाला आहे व त्यावर मी औषधी-उपचार करुन तुझा रोग बरा करु शकतो. तो रोगी त्यांच्या वैद्यकीय उपचाराने बरा होतो. मग त्या डॉक्टरला कोणी रोगवादी म्हणतील की निरोगवादी ? तसेच चार आर्यसत्याच्या माध्यमातून दु:खाने पिडित असलेल्या लोकांना दु:ख मुक्तीचा मार्ग सांगून त्यांना भगवान बुध्द याच जीवनामध्ये दु:ख मुक्त करतात अश्या भगवान बुध्दाला आणि त्यांच्या शास्त्रशुध्द तत्वज्ञानाला व शिकवणीला  निराशावादी कसे म्हणता येईल ? 

            जो निराशावादी किंवा दु:खवादी असेल तो केवळ दु:खाचा प्रचार करेल. तो लोकांच्या सुखाची कामना करणार नाही. मात्र ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ अशा मैत्रीभावनेचे शिकवण देणारे भगवान बुध्द लोकांच्या सुखाची कामना करतात. गेल्या कित्येक वर्षे भगवान बुध्दाच्या विपश्यना साधनेच्या दूर असणारे लोकं भगवान बुध्द किती धम्मवादी, सुखवादी व मंगलवादी होते ते अशा लोकांना कसे कळणार ?

      धम्मपदामध्ये सुख आणि दु:खाच्या बाबतीत खालील दोन आहेत. पहिले पद असे आहे-

      मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोती वा।

      ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं॥

      याचा अर्थ अशुध्द चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा त्याच्या मागे जसे गाडीला ओढणार्‍या बैलाच्या मागे त्या गाडीचे चाके येत असतात तसे दु;ख त्याच्या मागे येत असतात.

      दुसरे पद असे आहे-

      मनसा चे पसन्नेन, भासति वा करोती वा।

      ततो नं सुखमन्वेति, छाया व अनपायिनि ॥

      याचा अर्थ प्रसन्न चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा त्याची सावली जशी त्याचा पिच्छा सोडत नाही तसे सुख त्याच्या मागे येत असते.

      स्पष्ट आहे की मलीन चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते दुष्कृत्येच असेल आणि दुष्कृत्याचे फळ नेहमी दु:खदच असते. त्याचमाणे निर्मळ चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते सत्कृत्येच असेल आणि सत्कृत्याचे फळ नेहमी सुखदच असते.

      यापरुन धम्मपदामध्ये पहिल्या पदामध्ये दु:खाचे व दुसर्‍या पदामध्ये सुखाचे अशा दोन्हिही दु:ख आणि सुखाचे विवेचन केले आहे.

      जर धम्मपद हा ग्रंथ संपुर्णपणे वाचला तर त्यात धम्माच्या बाबतीत भगवान बुध्दाच्या शिकवणूकीचे निरनिराळ्या विषयावर २६ वग्गाचे संकलन केलेले दिसते. यामध्ये एक सुख वग्ग आहे. परंतु त्यात दु:खाचा एकही वग्ग नाही. म्हणून. भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे कसे म्हणता येईल ?

      भगवान बुध्दाने जसे दु:खाबाबत चर्चा केली तसे सुखाबाबत सुध्दा केली आहे. जेथे दु:खाबाबत चर्चा केली तेथे दु:खाचे कारणे प्रकाशात आणून ते दूर करण्यासाठी उत्साहित केले आहे. तसेच जेथे सुखाबाबत चर्चा केली तेथे त्याचे कारणे स्पष्ट करुन त्याचे सवंर्धन करण्यासाठी  उत्साहित केले आहे. त्यामुळे भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे म्हणने चुकीचे ठरेल.

      भगवान बुध्दाचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दु:खाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. त्यात आशा आहे. कारण मानवी दु:खाचा अंत करण्याचा मार्ग ते दाखवितात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये लिहिले आहे की, दारिद्र्य हे दु:खाचे उगमस्थान आहे. परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे.

सिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्‍त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्‍तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दाचे उपदेश ह्या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्‍या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून  घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक  आहे.  त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते.

भगवान बुध्दांनी एखाद्या कुशल वैद्याप्रमाणे चार आर्यसत्याचे मुलभूत विश्‍लेषण केले आहे. त्यांनी प्रथम रोगाचे निदान करुन त्याचे कारण जाणले आहे. तो रोग कसा निर्माण होतो, हे त्यांनी जाणले आहे. नंतर तो रोग नष्ट करण्याचे निश्चित केले व शेवटी त्यावर उपाय सांगितला. दु:ख हा रोग आहे. तृष्णा हे त्या रोगाचे कारण आहे  या रोगावर उपाय करता येतो. आर्यअष्टांगिक मार्गाने हा रोग कायमचा बरा करता येतो, हे सुत्र भगवान बुध्दांनी मांडले. म्हणूनच त्यांना अप्रतिम वैद्य आणि कुशल शल्यकार असे म्हटले जाते.

      आजच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ केवळ जातिवाचक झालेला आहे. मात्र भगवान बुध्दांच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही जातिचा असो तो धम्माच्या मार्गाने, शील-समाधी व प्रज्ञेचा अभ्यास करुन मुक्तीच्या चार पायर्‍यापैकी पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत जरी कोणी पोहचला तरी त्याला ‘आर्य’ असे संबोधल्या जात असे. त्यानंतर दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चवथी पायरी अहर्त येथपर्यंत प्रवास करणारे अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे.      आर्यसत्य म्हणजे आर्याचे किवा अहर्ताचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य म्हणजे  ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो’ अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य. असे अभिधर्मकोषभाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो. 

            सिध्दार्थ गौतम वयाच्या विसाव्या वर्षी शाक्य संघाचा सभासद झाल्यानंतर आठ वर्षाने एक अशी घटना घडली की, त्यामुळे सिध्दार्थ गौतमाच्या जीवनाला कलाटनी मिळाली. शाक्यांच्या राज्याला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपआपल्या शेतीकरिता वापरीत  होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. त्यावर्षी  त्यांच्या मध्ये फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या.

शाक्याच्या सेनापतीने कोलियांच्या विरुध्द युध्द पुकारण्याचा ठराव शाक्य संघामध्ये मांडला. सिध्दार्थाने या ठरावाला विरोध केला. सिध्दार्थ म्हणाले, “युध्दाने कोणतेही प्रश्‍न सुटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसर्‍या युध्दाची बिजे रोवली जातील. जो  दुसर्‍याची हत्त्या करतो, त्याला त्याची हत्त्या करणारा भेटतो. जो दुसर्‍याला जिंकतो, त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्‍याला लुबाडतो, त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. हा प्रश्‍न दोन्हिही बाजूचे प्रतिनिधी निवडुन सामोपचाराने मिटवावे ” परंतू सिध्दार्थाने मांडलेल्या या सुचनेचा काहिही उपयोग झाला नाही. सिध्दार्थाने सैन्य भरतीच्या निर्णयाला सुध्दा विरोध केला. या विरोधामुळे सिध्दार्थाला शाक्य संघाच्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार होते. त्याचे तीन स्वरुप होते. एक सैन्यात दाखल होऊन युध्दात सामील होणे, दुसरे देहान्तशासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे व तिसरे आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढऊन घेऊन, त्यांच्या मालमत्तेची जप्‍ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला आणि तिसरा पर्याय न स्विकारता त्यांनी परिवर्ज्या घेऊन देशत्याग करायाचे ठरविले.

सिध्दार्थ त्याची आई-गौतमी, वडील-शुध्दोधन व पत्‍नी-यशोधरा यांना भेटायला महालात गेले. आई-वडील अत्यंत दु:खमग्न झाले होते. यशोधराने मात्र धैर्याने व उदात्त मनाने अनुमती देऊन सिध्दार्थाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. यशोधरा म्हणाली, “ ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जेवनमार्ग शोढुन काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे.”

मानवजातीच्या  कल्याणाचा  ध्यास घेऊन सिध्दार्थाने राजगृह सोडला. राजगृह सोडण्याचे व परिव्रजा घेण्याचे हेच एक कारण होते. ज्याची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये केला आहे. मृत देह, आजारी आणि जराजर्जर झालेला व्यक्‍ती पाहून सिध्दार्थाने परिव्रजा घेतली, असे पारंपारिक व हास्यास्पद असे उत्तर दिले जातात. हे उत्तर विश्वासार्ह नाही व बुध्दीलाही पटण्यासारखे नाही. कारण सिध्दार्थाने आपल्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी परिव्रजा ग्रहण केली. परिव्रजा घेण्याचे हेच जर कारण असते तर ही तीन दृश्ये त्यांना कधी दिसली नाहीत कां ? ह्या शेकडयांनी घडणार्‍या नेहमीच्या घटना आहेत, आणि त्या तत्पूर्वी सिध्दार्थाच्या नजरेस न येणे असंभव आहे, असे  या ग्रंथाच्या ‘परिचय’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहले आहे.

सिध्दार्थाला कोलीय आणि शाक्य यांच्यातील युध्द संघर्षामुळे घर सोडावे लागले होते. परंतू त्यानंतर शाक्यांनी कोलियांसोबत शांततेने वाटाघाटी करुन हा प्रश्‍न सोडवावा म्हणून मिरवणुका व निदर्शने करुन मोठी चळवळ केली. परिनामत: कोलीय आणि शाक्य यांच्यात  समेट होऊन युध्द संपल्याचे सिध्दार्थाला त्यांचे सोबत असलेल्या पाच परिव्राजकाने सांगितले. ते पाच परिव्राजक म्हणजे   कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक होते. त्यांनी सिध्दार्थाला सुचना केली की, ‘आता यापुढे परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर राहावे. तरिही सिध्दार्थ घरी परत गेले नाहीत. कारण त्यांनी खोलवर विचार केला की, युध्द समस्या ही मूलत: कलहसमस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्‍त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आला आहे असे नव्हे: तर क्षत्रिय आणि ब्राम्हण यांच्यात, कुटुंब-प्रमुखात, मातापुत्रात, पितापुत्रात, भावाबहिणीत आणि सहकार्‍यांत देखील चालू आहे. राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त जरी असला तरी वर्गा-वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरुपाचा असतो. हा संघर्ष़च जगातील सर्व दु:खाचे मूळ होय. म्हणून या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर शोधून काढले पाहिजे असे सिध्दार्थाने  ठरविले होते.

 त्यामुळे सिध्दार्थ नव्या प्रकाशाच्या शोधात निघाले. मार्गात त्यांनी भृगुॠषीचा आश्रम पाहिला. सिध्दार्थाने त्या तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या कठोर तपश्‍चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच  पाहिले. अशा कठोर तपश्‍चर्या केल्याने स्वर्गप्राप्‍ती होते, दु:खमार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्‍ती होते व दु:ख हे पुण्याचे  मुळ आहे असे त्या तपस्व्यांना वाटत होते. हे ऎकल्यावर गौतम म्हणाला, “अशा  प्रकारचा आश्रम मी प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्‍चर्येचा नियमही मला समजलेला नाही. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्‍चर्या स्वर्गप्राप्‍तीसाठी आहे, तर ऎहिक जीवनातील दु:खाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वत: समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्‍न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे.”

भृगुॠषीचा आश्रम सोडून सिध्दार्थ आलारकालाम या मुनीकडे वैशालीला गेले. आलारकालाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिध्द होते. आलारकालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे सिध्दार्थाला वाटत होते. तेथे त्यांनी आलारकालामाला त्यांच्या सिध्दांताचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्‍त केली. आलारकालामांनी सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करुन सांगितली. तसेच त्यांनी ध्यानमार्गाचे तंत्र शिकविले. त्याच्या एकुण सात पायर्‍या होत्या. सिध्दार्थ त्या तंत्राचा रोज अभ्यास करायचा.  सिध्दार्थांनी त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविले. जेवढे काही शिकण्यासारखे होते ते आलारकालामांनी सिध्दार्थाला शिकविले. आलारकालामांनी जे काही शिकविले त्यापेक्षा वरच्या पायरीचे शिक्षण घेण्याकरीता सिध्दार्थ उद्दक रामपुत्त नांवाच्या योग्याकडे गेले. तेथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च पायरीचे शिक्षण घेऊ लागले. काही थोडया काळातच उद्दकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी सिध्दार्थांने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताला जेवढे काही शिकण्यासारखे होते ते उद्दक रामपुत्तांनी सिध्दार्थाला शिकविले. आलारकालाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिध्द होते. मगध देशातही अशाप्रकारे ध्यानमार्गसंपन्न योगी होते. त्यांची ध्यानमार्गाची प्रक्रिया श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. ही प्रक्रिया अत्यंत दु;खदायक होती. तरीही सिध्दार्थ ही प्रक्रिया आत्मसात करण्यात यशस्वी झाले. समाधीमार्गाचे अशाप्रकारचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

सिध्दार्थाने सांख्य तत्वज्ञान व समाधिमार्ग यांची कसोटी घेतली होती. परंतु वैराग्यमार्गाची कसोटी न घेता भृगुॠषीचा आश्रम सोडला होता. म्हणून या वैराग्यमार्गाची कसोटी सुध्दा घ्यावी म्हणजे स्वत: अनुभव घेऊन त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. म्हणून त्यांनी वैराग्यमार्गाचा अभ्यास करण्यासाठी  उरुवेला येथे निरंजना नदीच्या काठी निर्जन आणि एकांत ठिकाण निश्चीत केले. कोलीय आणि शाक्य यांच्यात  समेट होऊन युध्द संपल्याचे सिध्दार्थाला पाच परिव्राजकाने सांगितले होते ते सुध्दा याचठिकाणी वैराग्याचा अभ्यास करीत होते. वैराग्याच्या निरनिराळ्या पध्दतीचा अवलंब करुन ते इतक्या पराकोटीला गेले होते की, ते क्षणाक्षणाला यातना आणि वेदना घेऊनच जगत होते. अंगाचा थरकाप होईल इतक्या भयाण अरण्यात ते राहत होते. कडक थंडीत, कडक उन्हात, काळ्याकुट्‍ट आणि गुदमरवून टाकणार्‍या गर्द झाडीत राहत होते. जळलेल्या हाडाची ऊशी करुन स्मशानात झोपत होते. धान्याच्या एका दाण्यावर दिवसभर गुजराण  करीत होते. तपश्‍चर्या आणि आत्मक्लेश याचे स्वरुप इतके उग्र होते की, ते अत्यंत किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहचले होते. त्यांच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर साचून ते आपोआप पडत होते. त्यांचे पोट पाठीच्या कण्याला चिकटले होते. याचे कारण ते अत्यंत कमी खात होते. अशा प्रकारची त्यांची तपश्‍चर्या आणि आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते. सहा वर्षेनंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले की, त्यांना हालचाल सुध्दा करता येत नव्हती. इतकी कठोर तपश्‍चर्या करुनही त्यांना नवीन प्रकाश दिसला नाही. ज्या प्रश्‍नावर त्याचे मन केन्द्रित झाले होते त्या ऎहिक दु:खाविषयीच्या प्रश्‍नाचा त्याला यत्‍किंचितही उलगडा झाला नव्हता. त्यांनी विचार केला की, ज्यांची शक्‍ती नष्ट झाली, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून  गेला, ज्याचे मन अशांत झाले त्याला नवा प्रकाश कसा प्राप्‍त होईल ? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्‍तीनेच मिळु शकते. म्हणून वैराग्यमार्गाची कसोटी सोडून त्यांनी सुजाताने दिलेले अन्न भक्षण केले. तपश्‍चर्या आणि आत्मक्लेश याचा त्याग केल्यामुळे त्यांचे सोबतचे पाच परिव्राजक रागाने त्यांना सोडून गेले.

सिध्दार्थ गौतम उरुवेला सोडून गयेला आले. तेथे पिंपळ्वृक्षाखाली ध्यानस्थ बसले. ज्ञान प्राप्‍तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असता त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी, चार आठवडे चिंतन केल्यावर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला; अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला.

   

      भगवान बुध्दाचा दु:खमुक्तीच्या  मार्गाचा विचार करण्यापुर्वी पहिल्यांदा त्यांच्या शिकवणीचे तीन लक्षणे समजून घेणे आवश्यक आहे. कारण ते दु:ख निर्मिती व दु:खमुक्तीच्या बाबीशी निगडीत आहेत. त्यांच्या धम्माचे अनित्य, अनात्म, आणि दुख असे तीन लक्षणे आहेत, 

अनित्यता

      अनित्यता हे पहिले लक्षण आहे. भगवान बुध्द म्हणतात, “सर्व वस्तु अनित्य आहेत. जे अनित्य आहे ते दु;ख आहे. जे दु:ख आहे ते ‘मी नाही’ ‘माझे नाही’ ‘माझा आत्मा नाही.”

      जे नित्य नाही ते अनित्य आहे. जगातील सर्वच संस्कारित  गोष्टी अनित्य आहेत. कारणांनी उत्पन्न होणार्‍या सर्व गोष्टी अनित्य आहेत. डोळ्यांना जे दिसते ते अनित्य आहे. कानांना जे ऎकु येते ते अनित्य आहे. जिभेने ज्याची चव घेतली जाते ते अनित्य आहे. नाकाने ज्याचा वास घेतला जातो ते अनित्य आहे. त्वचेने ज्याचे स्पर्श ज्ञान होते ते अनित्य आहे. मनाने केलेली कल्पना व विचार अनित्य आहे. तसेच डोळे, कान, जिभ, नाक, त्वचा व मन यांच्या स्पर्शाने होणार्‍या वेदना की ज्या सुखकारक, दु:खकारक किंवा असुखकारक, अदु:खकारक असतात त्या सुध्दा अनित्य आहेत.

      एक निर्वाण सोडले तर जगातील सर्वच गोष्टी संस्कारित म्हणजे दोन किवा अधिक घटकांनी मिळून झालेल्या आहेत. म्हणून निर्वाण सोडून जगातील सर्वच गोष्टी अनित्य आहेत.

      रुप (शरिर), वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पंचस्कंध अनित्य आहेत. त्याचा उदय होतो आणि लय होतो. जे अनित्य आहे ते दु:ख आहे. जे दु:ख आहे ते अनात्म आहे. जे अनात्म आहे, ‘ते ना मी आहे, ना माझे आहे, ना माझा आत्मा आहे.’ याला यथार्थत: प्रज्ञापुर्वक पाहिले पाहिजे. अशी शिकवण त्रिपिटकात विशेषत: संयुक्त निकायात जागोजागी वाचावयास मिळते.

      कोणाच्या अपमानास्पद बोलण्याने आपला अहंभाव दुखावला गेला की दु:खदायक वेदना होतात. वास्तविक ते नुसते शब्द असतात. जी वेदना निर्माण होते ते आपल्या ‘मी’पणाच्या भावनेवर ठरते. जर आपल्यात लोभ, द्वेष व मोह नसेल तर ते बोलणार्‍याचे शब्द आपण उपेक्षा वृत्तीने ऎकतो. त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत जी वेदना निर्माण होते ती ना सुखकारक असते ना दु:खकारक. त्या बोलण्यामुळे आपण कंपीत न होता निश्चल राहतो. आपले चित्त विचलीत होत नाही.

      एकदा भगवान बुध्दांकडे एक मनुष्य आला आणि तो बराच वेळ भगवान बुध्दांना शिव्याशाप देऊ लागला. परंतु भगवान बुध्द विचलीत झाले नाहीत.  तेव्या त्याने भगवान बुध्दांना विचारले की, ‘तुम्ही शांत कसे?’

      भगवान बुध्द म्हणाले की, ‘जर एखाद्या माणसाने एखादी वस्तु तुला भेटवस्तू देण्यासाठी आणले व ती तु स्विकारlली नाही तर ती कोणाजवळ राहील?’

      तो मनुष्य म्हणाला, ‘अर्थातच ज्या माणसाने आणली त्याचेकडेच राहील.’

      भगवान बुध्द म्हणाले, ‘तु दिलेल्या शिव्याशापाची भेटवस्तू मी स्विकारली नाही तर ती कोणाकडे राहील.’

      तेव्हा तो मनुष्य खजील झाला व भगवान बुध्दांना शरण गेला.

      म्हणून भगवान बुध्द म्हणतात की, जे अनित्य आहे ते दु;ख आहे. जे दु:ख आहे त्याला हे ‘मी नाही, हे माझे नाही, हा माझा आत्मा नाही.’ असे यथार्थत: प्रज्ञापुर्वक पाहिले की चित्ताची आसक्ती निर्माण होणार नाही. त्यामुळे ‘मी, माझ्या’ या भावनेला कवटाळून न धरल्यामुळे ‘अहंभाव’ निर्माण होणार नाही  आणि त्यामुळे माणसाना दु:ख होणार नाही 

      भगवान बुध्दांचे शेवटचे शब्द-

      हन्द दानि भिक्कवेआमन्त्यामि।

      व्यय धम्मा संक्‍खारा अप्पमादेन सम्पादेथ॥

      याचा अर्थ खरोखर भिक्खूंनो, ‘मी तुम्हाला सांगतो, सर्व संस्कारित गोष्टी नष्ट होणार्‍या आहेत. तेव्हा अप्रमादपूर्वक आपल्या जीवनाचे ध्येय संपादन करा.’

      भगवान बुध्दांचे हे वाक्य सर्व बुध्द धम्माचे सार आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सर्व मानव जातीला यशस्वी जीवन जगण्याचा संदेश आहे. सगळ्याच संस्कारित गोष्टी अनित्य आहेत. बदल होणार्‍या आहेत. परिवर्तनशील आहेत. तेव्हा त्यात गुंतून न राहता आपले ध्येय संपादीत करावे.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहीले आहे की, भिक्खू रठ्ठ्पाल यांना सम्यक सम्बुध्दांनी चार तत्वे सांगितले. ते असे- 

      १  जग अनित्य असून सतत बदलत आहे.

      २. जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही.

      ३. आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे.

      ४. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दु:ख आहे. आणि त्यामुळे जगात अनेक ऊणीवा असून ते सारखे धडपडत आहे.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात म्हणतात की, अनित्यतेच्या सिध्दांताला तीन पैलू आहेत-

१)      अनेक घटकांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत.

२)     व्यतिगत रुपाने प्राणी अनित्य आहेत. आणि

३)     प्रतित्वसमुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहेत.

      सर्व वस्तू ‘हेतू आणि प्रत्यय’ यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नसते. जो प्राणी भूतकाळात होता. तो तसाच वर्तमानकाळात दिसणार नाही. शरीरातील प्रत्येक अणु-रेणू बदलत असतात. शरीर, मन बदललेले असते. विचार आणि विचार करणारी यंत्रणा बदललेली असते. पूर्वी लहान होतो. नंतर तरुण, वयस्क व शेवटी म्हातारे झालोत. म्हणजेच मनुष्य आणि इतर सर्वच प्राणी, वनस्पती हे परिवर्तनशील आहेत. जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू असते. जग जर परिवर्तनशील नसते तर सर्व पाणीमात्राचा विकास झाला नसता. म्हणून भगवान बुध्दांनी सांगितले की, जग हे अनित्य आहे. ते सतत बदलत असते.

अनात्मतता

      अनात्मता हे दुसरे लक्षण आहे. अनत्तलक्खण सुत्तात भगवान बुध्दांनी अनात्मवादाची लक्षणे सांगितली आहेत. अनात्मततेला पाली भाषेत अनत्त असे म्हणतात.

      जगात जर आत्मा असेलच तर तो स्वतंत्र असला पाहिजे. पण तसे आढळत नाही. शरीर म्हणजे रुप हे काही आत्मा असु शकत नाही. जर शरीर हे आत्मा असते तर त्या शरीराला क्लेश झाले नसते. त्यात परिवर्तन झाले नसते. कालमानानूसार बदललेले नसते. पंचस्कंधापैकी इतर चार स्कंध म्हणजे वेदना, विज्ञान, संज्ञा, संस्कार हे सुध्दा आत्मा असु शकत नाही. कारण ते नाक, कान, डोळे, जिव्हा आणि त्वचा या इंन्द्रियावर आणि त्याचे विषयावर म्हणजे गंध, आवाज, दृश्य आकृती किंवा रंग, स्वाद आणि स्पर्श या विषयावर अवलंबून आहे. जसे इंद्रिय, इंद्रियविषय अनित्य आहेत. तसेच  वेदनास्कंध, विज्ञानस्कंध, संज्ञास्कंध, संस्कारस्कंध हे सुध्दा अनित्य आहेत  म्हणून ह्या परिवर्तनशीलतेमुळे आत्मा आहे असे म्हणता येणार नाही.

      मनुष्याला जेव्हा जाणीव होते की जगातील सर्व गोष्टी म्हणजे ‘मी नाही, माझी नाही, माझा आत्मा नाही’ तेव्हा त्या गोष्टीबद्दलची त्याची आसक्ती नष्ट होते आणि तो आसक्तीपासून मुक्त होतो. आत्म्यासंबंधीच्या ‘मी आहे, माझे आहे, माझा आत्मा आहे’ या भ्रामक कल्पनेमुळेच मनुष्य स्वत:च्या हिताकडे जास्त लक्ष देतो. मग दुसर्‍याचे नुकसान झाले तरी त्याचे त्याला काही सोयरसूतक नसते. अशा मनुष्याच्या प्रवृतीमुळेच सर्व प्रकारचे दु:ख उत्पन्न होते. दु:ख रोगावर सर्वात प्रभावी औषध म्हणजे जगात आत्मा नाही याची जाणीव ठेवणे होय.

अनत्त (अनात्मता) या शब्दाचे स्पष्टीकरण तीन प्रकारे केले आहे-

१) असार कत्थेन अनत्ता

      माणसाचे शरीरातील प्रत्येक अणु-रेणू बदलत असतात. शरीर, मन बदललेले असते. विचार आणि विचार करणारी यंत्रणा बदललेली असते. पूर्वी लहान होतो. नंतर तरुण, वयस्क व शेवटी म्हातारे झालोत.. जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू असते म्हणून या बदलणार्‍या नाम आणि रुपात म्हणजेच शरीर आणि मनात न बदलणारा असा आत्मा वास करु शकत नाही..

२) असामी कत्थेन – अनत्ता

      नाम आणि रुपात सतत उदय आणि लय किंवा बदल होत असल्यामुळे त्यांचा कोणी स्वामी अथवा मालक असणे शक्य नाही. अनित्यमुळे वस्तुमात्रात उदय आणि लय होणे हा त्याचा मूळ गुणधर्म आहे. हा उदय आणि लय कोणी सांगतो म्हणून किवा कोणाच्या हुकूमावरुन होत नसून संस्कारीत गोष्टीच्या मूळ गुणधर्माप्रमाणे होतो. म्हणून त्यांना कोणी स्वामी अथवा मालक नाही. ते स्वत:ही त्यांचे मालक नाहीत, म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल.  जर पंचस्कंधाचा (रुप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार) कोणी स्वामी अथवा मालक असता तर आत्मा म्हणाला असता की माझ्या शरीराला काही क्लेश अथवा दु:ख देऊ नको. पण तसे काही होत नाही. म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल.

३) अवसवत्तनत्थेन – अनत्ता

      पंचस्कंधात जे अव्याहतपणे बदल होत असतात तो कोणाच्याही इच्छेने होत नसतो. म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल.

      जर आत्मा असता तर त्याने इच्छा केली असती की माझे रुप असे, असे व्हावे; पण तसे होत नाही. कोणाच्या इच्छेने बदल होत नाही तर ते नैसर्गिकरीत्या अनित्यमुळे घडत असते. नैसर्गिक बदलामुळे म्हातरपण येते, मरण येते. तेथे आत्म्याचे काहीही चालत नाही. म्हणून आत्मा नाही, किंवा अनात्म आहे असे म्हणता येईल. 

      जगातील आत्मवादी लोकांचे आत्म्याच्या कल्पनेसंबंधी एकवाक्यता नाही. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातील शिकवणीप्रमाणे आत्मा आहे. पण मनुष्य प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा पुन: पुन्हा जन्म घेत नाही. कोणत्याही हिंदुच्या वेदात सुध्दा आत्म्याच्या पुनर्जन्माविषयी एकही वेदमंत्र नाही. जैन धर्मातील आत्मा निरनिराळ्या प्राणीमात्रांच्या शरीराच्या आकारमानाप्रमाणे लहान-मोठा असतो. मुंगीचा आत्मा मुंगीच्या आकाराएवढा तर हत्तीचा आत्मा हत्तीच्या आकाराएवढा, किंवा अष्टकोनी किंवा चेंडूसारखा गोल असून तो पाचशे योजनेच्या व्यासाचा असतो. चार्वाकसारखा विचारवंत म्हणतात की, एकदा जर शरीर भस्मीभूत झाले तर त्याचे पुनरागमन कोठून होणार? असा प्रश्‍न उपस्थीत करतात. भगवद्‍गीतेतील विचारसरणीप्रमाणे आत्मा सूक्ष्म असून आपण जसे जीर्ण वस्त्र बदलवतो तसे तो शरीर बदलवत असतो. काही लोकांच्या विचारसरणीप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये एकच आत्मा आहे, तर दुसर्‍या काही लोकांच्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक  प्राण्यांमध्ये वेगवेगळा आत्मा आहे.

      तसेच आत्मवादी लोकांचे आत्म्याच्या स्वरुपाविषयी सुध्दा एकमत नाही. काही लोकं म्हणतात की आत्म्याला रुप आणि आकार आहे, तर काही लोकं म्हणतात की आत्मा निराकार आणि अनंत आहे. काही लोकं म्हणतात की आत्मा अनुभवशील आहे, तर काही लोकं म्हणतात की आत्मा अनुभवशील नाही. आत्म्याविषयीच्या असलेल्या ह्या वेगवेगळ्या कल्पना अशा तर्‍हेने केवळ कल्पनेचे खेळ आहेत. त्यात सत्याचा लवमात्र अंश नाही.

      अशा या आत्म्याविषयीच्या अनेक भ्रामक कल्पनांचा मुद्देसूद ऊहापोह दीघनिकायातील ब्रम्हजाल सुत्तात केला आहे.

      काही  आत्मवादी म्हणतात की, शरीर बदलत असते पण आत्मा बदलत नाही. या बाबतीत सुध्दा आत्मवादी लोकांमध्ये एकमत नाही. जैन धर्मातील आत्मा शरीराच्या आकारमानाप्रमाणे लहान-मोठा असतो. असे असेल तर जन्माच्या वेळी आत्मा लहान असला पाहिजे. जस-जसा तो मोठा होत जाईल तस-तसा आत्मा पण मोठा होत जात असला पाहिजे. इतर धर्मीय आत्म्याचे निश्चित स्वरुप सांगत नाहीत. जर सर्व प्राणीमात्रात जर एकच आत्मा असेल तर एकाचे डोके दुखले तर दुसर्‍याचे सुध्दा डोके दुखायला पाहिजे. पण असे अनुभवाला येत नाही. कॊणी म्हणतात की, प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळा आत्मा असतो. असे जर असेल तर दहा लाख वर्षापूर्वी जी लोकसंख्या होती ती आज कां वाढली? हे वाढलेल्या संखेचे आत्मे आले कोठून? असा प्रश्‍न निर्माण होतो. जर प्रत्येक जन्माच्या वेळी नवीन आत्मा निर्माण झाला असेल तर आत्मा न बदलणारा आहे असे कसे म्हणता येईल? म्हणून आत्मा नाही असेच म्हणावे लागेल.

      काही  आत्मवादी म्हणतात की, त्यांचा आत्मा जाळल्याने जळत नाही. कापल्याने कापत नाही. उन्हाने वाळत नाही आणि वितळवीण्याने वितळत नाही. असा तो अविनाशी आणि नित्य आहे. शरीरातील आत्म्याच्या अस्तित्वामुळेच प्राणी जीवंत राहतात आणि आत्मा शरीरातून निघून गेल्यावर ते मरतात.

      शरीरात आत्मा आहे म्हणून प्राणी जगतो की त्याचे शरीर ठाक-ठीक आहे म्हणून तो जगतो. याबाबत ते आत्मवादी काहीच ठामपणे सांगु शकत नाहीत. मनुष्य जर ८० किवा ९० टक्के भाजला तर तो जगू शकत नाही. जळाल्यामुळे तो मरतो. जर शरीरातील आत्मा जाळल्याने मरत नाही तर शरीरात आत्मा असून सुध्दा जळालेला मनुष्य कसा मरतो? कापल्याने आत्मा मरत नाही तर एखाद्याला भोसकले तर तो मनुष्य शरीरात आत्मा असून सुध्दा कसा मरतो? उन्हाने वाळत नाही आणि वितळवीण्याने वितळत नाही. तर एखाद्याला उष्माघात झाला तर तो मनुष्य शरीरात आत्मा असून सुध्दा कसा मरतो? याचा अर्थ शरीरात आत्मा असल्यामुळे तो जीवंत राहतो हे शरीरशास्त्रदृष्ट्या खरे नाही. शरीरात आत्मा आहे म्हणून तो जीवंत राहत नसून त्याच्या शरीराची यंत्रणा सुरळीतपणे काम करते म्हणून मनुष्य जीवंत राहतो हे खरे असते.

      भगवद्‍गीतेतील विचारसरणीप्रमाणे आत्मा जीर्ण वस्त्र बदलवतो तसे तो शरीर बदलवत असतो. असे जर असते तर जन्म न घेतलेल्या किंवा जन्माला आलेल्या मुलींना मारले जातात तेव्हा त्यांच्यातील आत्म्यांना अजून ते शरीर जुने झाले नसतांना सुध्दा त्यांचे शरीर कसे जिर्ण होते? जर आत्मा जुने शरीर टाकून नविन शरीर धारण करतो, तर दरवर्षी वाढणार्‍या लोकसंख्येत हे नविन आत्मे येतात कोठून? कोणी आत्मवादी माणसाच्या मनाला आत्मा म्हणतात. माणसाचे मन तर सतत बदलत असते. ते अत्यंत चंचल व अस्थिर असते. म्हणून मन हे न बदलणारा आत्मा असु शकत नाही.

      यावरुन असे दिसून येईल की, आत्मवाद्यांचे एकही म्हणणे कसोटीला उतरत नाही. म्हणून बौध्द विचारप्रणाली आत्म्याच्या अस्तित्वाला मानत नाही. बौध्द अनात्मवादी आहेत. बौध्द मताप्रमाणे ज्याला आपण सजीव प्राणी असे म्हणतो तो खरोखरच चेतनामय शक्ती आणि शारीरीक अविष्कार असतो. त्या शक्ती म्हणजे पंचस्कंध होय. हे पंचस्कंध म्हणजे रुपस्कंध, वेदनास्कंध, विज्ञानस्कंध, संज्ञास्कंध व संस्कारस्कंध होय.

      मनुष्यप्राण्याचे सर्व घटक म्हणजे नामरुप, विज्ञान, संज्ञा, वेदना, व संस्कार तसेच पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू हे पंचस्कंधात सामावलेले आहेत. पंचस्कंधाशिवाय मनुष्यप्राण्यात दुसरा कोणताच घटक अस्तित्वात नाही. असा कोणताच घटक नाही की जो पंचस्कंधात सामावलेला नाही. सर्व पंचस्कंध सतत बदलणारे आहेत. परिवर्तनशील  आहेत.

      तसेच रुप (शरीर) हे १) पृथ्वी, २) पाणी, ३) अग्नी आणि ४) वायू या चार घटकांचे बनलेले आहेत  तसेच प्रत्येक वस्तू हे चार घटकांचे बनलेले असते. हे चार घटक सृष्टीमध्ये निसर्गत:च विद्यमान असतात.

      चेतनामय शक्ती ही वेदना, संज्ञा, संस्कार, व विज्ञान, यांची  मिळून बनलेली असते.

      एखाद्या बाह्यस्थितीचा आपल्या ज्ञानेंद्रियाला स्पर्श होताच जे तरंग शरीरात निर्माण होतात ते म्हणजेच वेदना. वेदना कशी निर्माण होते ते मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे.

      आपल्या सर्व प्रकारच्या संवेदना वेदनास्कंधात मोडतात. वेदना म्हणजे इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी संपर्क झाला असतांना जाणवणारी अनुभूती होय. ह्या अनुभूती तीन प्रकारच्या असतात-

१)      सुखमय अनुभूती

२)     दु:खमय अनुभूती

३)     अदु:खमय व असुखमय अनुभूती

वेदनास्कंध

      एखादे रुप पाहिल्याने, आवाज ऎकल्याने, वास घेतल्याने, चव घेतल्याने, स्पर्श केल्याने व मनांत कल्पना किंवा विचार आल्याने संवेदना निर्माण होत असतात. त्या सहा प्रकारच्या  संवेदना डोळा, कान, नाक, जिभ,  त्वचा आणि मन अनुभवत असतो.  जेव्हा ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय  विज्ञान यांचा समन्वय झाल्याने स्पर्श होतो, तेव्हाच संवेदना निर्माण होत असतात. म्हणून  स्पर्शामुळे वेदना निर्माण होत असतात. जसे एखादे सुंदर फुल, पाहणार्‍यांचा डोळा आणि त्याचे विज्ञान यांचा समन्वय झाला म्हणजे सुखमय अनुभूती होते

संज्ञास्कंध

      संज्ञास्कंधाचे कार्य म्हणजे इंद्रियविषयांना ओळखणे, त्याची जाण करणे होय.    संवेदना प्रमाणे संज्ञा सहा  प्रकारच्या आहेत. जसे रुपाला ओळखणे,  आवाजाला  ओळखणे, वासाला ओळखणे, चवीला  ओळखणे, स्पर्श केल्याने व मनांत कल्पना किंवा विचार आल्याचे ओळखणे  असे ते . सहा प्रकारच्या  संज्ञा आहेत.

      विज्ञान आणि संज्ञा यांच्यात एक प्रकारचे सारखेपणा आहे. पण विज्ञानामुळे इंद्रियविषयांच्या अस्तित्वाची जाण होते, तर संज्ञा त्याच्या विशिष्ट खुणांमुळे त्या वस्तुला इतर वस्तुतून ओळखते. संज्ञा मुळे वस्तुचे स्मरण होते.

 संस्कारस्कंध

      संस्कारस्कंधात संवेदना आणि जाणण्याची किंवा ओळ्खण्याची क्षमता सोडून मनाच्या इतर सर्व भागांचा समावेश होतो. म्हणून याला संस्कार चेतना असे सुच्दा म्हणतात. मनाच्या व्यवहारात चेतना किंवा ईच्छा फार महत्वाचे कार्य करते. कार्य करण्याच्या ईच्छेने एखादे कार्य केले तरच बुध्दधम्माप्रमाणे ते ‘कर्म’ होते. ईच्छा नसतांना जर एखादे कार्य केले तर ते ‘कर्म’ होऊ शकत नाही.

      संवेदना आणि संज्ञा याच्याप्रंमाणे चेतना सुध्दा सहा प्रकारच्या आहेत. जसे रुपाचे कार्य,  आवाजाचे कार्य,  वासाचे कार्य, चवीचे कार्य,  स्पर्शाचे कार्य,  स्पर्श केल्याने व मनांत कल्पना किंवा विचार आल्याने होणारे कार्य  असे ते  सहा प्रकारच्या  संस्कार आहेत.

विज्ञानस्कंध

      सर्व स्कंधात विज्ञानस्कंध अत्यंत महत्वाचे आहे. विज्ञानाने  जाणण्याची व  निरनिराळ्या प्रकारे अनुभूती घेण्याची क्रिया करता येते. आपण आपल्या पांच ईंद्रियाद्वारे आणि मनाद्वारे निरनिराळ्या प्रकारची अनुभूती घेत असतो. जसे आपण आपल्या डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणत असतो. कानाद्वारे आवाज जाणत असतो. नाकाद्वारे वास जाणत असतो. जिभेद्वारे चव जाणत असतो. त्वचेद्वारे स्पर्श जाणत असतो. आणि मनाद्वारे कल्पना आणि विचार जाणत असतो. अशा तर्‍हेने विज्ञान सहा प्रकारचे आहेत. चक्षू विज्ञान, कर्ण विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, स्पर्श विज्ञान आणि मनो विज्ञान. दृश्य आकृती आणि रंग, आवाज, वास, चव, स्पर्श, कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय असले आणि त्याचा संबंध अनुक्रमे डोळे, कान, नाक, जिभ, त्वचा व मन या इंद्रियांशी आला तरच विज्ञान जागृत होते, इतर वेळी नाही. अशा वेळेस सुख-दु:खाच्या भावना निर्माण होतात.      

      त्याचप्रमाने कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय मनात आले तरच मनिंद्रिय विज्ञान जागृत होते आणि सुख-दु:खाच्या भावना निर्माण होतात.  ह्यावरुन असे स्पष्ट होते की इंद्रिय आणि विषयाचा एकमेकांशी संबंध आलाच तर विज्ञान जागृत होते. कारण त्यावेळी आपले च्क्षुंद्रियविषय विज्ञान जागृत नसते. म्हणून इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियाच्या विषयाचा एकमेकांशी संबंध असतो. ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणूनच विज्ञान सुध्दा शाश्वत नाही तर ते क्षणाक्षणाला बदलत असतात.

      अशा तर्‍हेने जिवंत प्राण्याच्या जिवंतपणाचे सर्व व्यवहार चेतनामय शक्ती आणि शारीरिक शक्ती रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या पंचस्कंधामुळे होत असतो.

      म्हणजेच सक्षम इंद्रिय, इंद्रिय विषय आणि इंद्रिय विज्ञान यांचा समन्वय झाला की स्पर्श निर्माण होते. स्पर्श निर्माण झाला की सुखमय, दु:खमय, व अदु:खमय व असुखमय वेदना उत्पन्न होतात. अशा तर्‍हेने सुख-दु:ख निर्माण होते व त्याची अनुभूती जाणवते, त्यामुळे सुख-दु:ख भोगणारा कोण ? हा प्रश्‍न निर्माण होत नाही. कारण सुख-दु:ख भोगणारा कोणी आत्मा नावांचा पदार्थ शरीरात किंवा शरीराबाहेर राहत नाही.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात म्हणतात की, ‘भगवान बुध्दांनी आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी मानलेली आहे. ईश्वराच्या अस्तित्वाइतकाच  आत्म्याच्या अस्तित्वासंबंधीचा विश्वास सम्मादिट्ठीला (सम्यक दृष्टी) घातक आहे. भगवान बुध्दांनी सांगितले आहे की, ईश्वरावरील  विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो, त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. त्यांच्या मते आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षाही भयंकर आहे. कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो, एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. भगवान बुध्दांनी महालीला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, आत्मा नावाची काही वस्तू नाही. म्हणूनच त्यांच्या सिध्दांताला अनात्मवाद असे म्हणतात.’

            भगवान बुध्द म्हणतात की, आत्म्याचे अस्तित्वावर विश्वास ठेवणे हे अज्ञान असून हे अज्ञान माणसाच्या सर्व दु:खाचे, समस्येचे मुळ कारण आहे. अशा अज्ञानामुळेच त्यांच्यात ‘मी’ ‘माझे’ अशी भावना निर्माण होते. त्यामुळेच त्यांच्यात लोभ, द्वेष व तृष्णा निर्माण होते. परिणामत: तो पापकर्म, अकुशल कर्म करु लागतो व ते दु:खाच्या उत्पत्तीचे कारण बनते. भगवान बुध्दांची शिकवण माणसाचे अज्ञान दूर करुन त्याला प्रज्ञावंत बणविण्यासाठी आहे. त्याची प्रज्ञा विकसित झाली की जग जसे आहे तसे तो पाहतो. त्यामुळे कोणत्याही उत्पतीच्या मागे कारण असते हे त्याला कळते. त्यामुळे जग अनित्य आहे, जे अनित्य आहे ते दु;ख आहे. जे दु:ख आहे ते ‘मी नाही, माझे नाही, माझा आत्मा नाही’ असे त्याला दिसते.  हा माझा आत्मा नाही.’ असे यथार्थत: प्रज्ञापुर्वक पाहिले की चित्ताची आसक्ती निर्माण होणार नाही. त्यामुळे ‘मी, माझ्या’ या भावनेला तो कवटाळून न धरल्यामुळे ‘अहंभाव, मीपणा’ निर्माण होणार नाही. तो दु:ख आर्यसत्यांना यथार्थपणे जाणेल. तो सुख-दु;खांना तटस्थेच्या भावनेने पाहू लागेल. त्यामुळे त्याच्यात तृष्णा निर्माण होणार नाही. त्याच्यातील लोभ, द्वेश, मोह नष्ट होऊन त्याऎवजी मैत्री आणि करुणा यांचा विकास होईल. म्हणजेच त्याला दु:ख होणार नाही. तो कुशल कर्म करु लागेल व अशा तर्‍हेने तो निर्वाणाकडे वाटचाल करेल.  अशा प्रकारे दु:खापासून दूर राहून निर्वाणाकडे वाटचाल करता  येते अशी भगवान बुध्दाने आपल्या शिकवणीत मांडणी केली आहे.

टिप- सदर लेख ’दैनिक लोकनायक, ठाणे यामध्ये दि.२५,२६ व २७-७-२०११ रोजी प्रकाशित झाले आहे.

           दु:ख, अनित्यता, अनात्मता आणि निर्वाण हे बुध्द धम्माचे मूलभूत सिध्दांत आहेत. हे चारही सिध्दांत प्रतित्यसमुत्पादावर आधारित आहेत. त्यांचा उगम प्रतित्यसमुत्पादापासून झाला आहे. हा सिध्दांत ईतका महत्वाचा आहे की, जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो असे भगवान बुध्द म्हणतात. या सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने पुन्हा पुन्हा जन्म घेणे व पुन्हा पुन्हा मरणावस्था प्राप्त करणे अशा या संपुर्ण भवचक्राचा उलगडा केला आहे. जन्म आणि मरणाचा हा क्रम अनादिकाळापासून एखाद्या चक्राप्रमाणे अखंड गतीने चालत आलेला आहे. अशा या जन्म आणि मरणाच्या रहस्यावर  भगवान बुध्दाने प्रतित्यसमुत्पाद या सिध्दांताच्या आधारे प्रकाश टाकून भवचक्राच्या प्रवृती व निवृतीच्या मुळाशी असलेल्या कारणाचे दिग्दर्शन केले आहे.

      भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पाद म्हणजे काय ते ‘मझिमनिकायातील चूलसकुलदायिसुत्तात’ असे सांगितले –

      ‘इमस्मिं सति इदं होति ।

      इमस्सुप्पादा इदं उपज्जति ॥

      इमस्मिंअसति इदं न होति ।

      इमस्स निरोधा इदं निरुज्जति ॥’

      ‘ह्याच्या होण्यामुळे हे होत असते.

      ह्याच्या न होण्यामुळे हे होत नसते.

      ह्याचा उत्पन्न होण्यामुळे हे उत्पन्न होत असते.

      ह्याचा निरोध केल्याने.

      ह्याचा निरोध होत असतो.’

पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित यांनी सारीपुत्तांना भगवान बुध्दांचा धम्म संक्षेपाने सांगितला-

      ‘ये धम्मा हेतुप्पभवा, हेतुं तेसं तथागतो आह ।

      तेसंच यो निरोधो, एवं वादी महासमणो ॥’

      ‘जी दु:खे, ज्या गोष्टी (धम्म) कारणांपासून उत्पन्न होतात, त्यांची कारणे तथागतांनी सांगितली आहेत आणि त्यांचा निरोध कसा करावा हे त्यांनी सांगितले      आहे. हेच महाश्रमणांचे मत आहे.’

      यावरुन हे स्पष्ट होते की, अगदी सुरुवातीपासूनच भगवान बुध्दांच्या धम्माचा पाया प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतावर आधारलेला होता.

            संयुक्‍त निकायात नमुद केल्याप्रमाणे भगवान बुध्द  भिख्कु आनंदाशी संवाद करीत असतांना म्हणाले की, ‘प्रतित्यसमुत्पाद हा सिध्दांत फार गंभ्रीर आहे. गूढ आहे. या धम्माला योग्य प्रकारे न जाणल्यामुळे आणि न समजल्यामुळे प्रजा गुंता झालेल्य धाग्याच्या गुंडीसारखी, गाठी पडलेल्य  दोरीसारखी आणि गोळा झालेल्या मुंजाच्या गवतासारखी होऊन, अपायात पडून दुर्गतीला प्राप्‍त होत आहे.’

      महापधान सुत्तात भगवान बुध्द  म्हणतात की, ‘आसक्‍तीत पडलेल्या, आसक्‍तीत रममाण असलेल्या आणि आसक्‍तीत आनंद मानणार्‍या सामान्य लोकांसाठी हे कठीन आहे की कार्यकारणासंबंधी प्रतित्यसमुत्पादाला ते समजून घेतील.’ सर्वसामान्य लोक ईश्वर, देवदेवता, दैववाद, कर्मकांड, आत्मा इत्यादी संबंधीत मिथ्यादृष्टीत गूतले होते. त्या प्रवाहाच्या विरोधात जाणारा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत त्यांना समजेल की नाही याबाबत भगवान बुध्दांना शंका वाटत होती. परंतु महाकारुणिकांच्या असिम मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा या ब्रम्हविहाराच्या भावनेने त्यांना प्रवृत केले की जगातील काहीतरी लोकं हा धम्म समजू शकतील. त्यानंतरच त्यांनी आपल्या सिध्दांताची शिकवण जगाला देण्याचा निश्चय केला.

      प्रतित्य म्हणजे प्रत्यय किंवा कारण आणि समुत्पाद म्हणजे उत्पत्ती. अर्थात प्रतित्यसमुत्पाद म्हणजे हेतूमुळे किंवा कारणामुळे कार्याची उत्पत्ती होणे.    ह्याच्या उत्पन होण्यामुळे हे उत्पन होत असते. यालाच  कार्यकारणभाव (Cause and effect) असेही म्हटले जाते. प्रतित्यसमुत्पादाला प्रत्ययाकार किंवा पच्चयाकार निदान असेही म्हणतात. त्याचा संबंध अनित्यता आणि अनात्मता यांचेशी आहे. कोणताही पदार्थ शाश्वत नाही. सव संस्कारीत पदार्थ अनित्य आहेत, क्षेणैक आहेत आणि हेतुप्रत्ययजनित आहेत. प्रतित्यसमुत्पादाला ‘मध्यमावर्ग’ असेही म्हणतात. बुध्दधम्मात शाश्वत दृष्टी व उच्छेद दृष्टी यांना टोकाचे दोन मार्ग असे म्हटले आहे. महास्थविर बुध्दघोषांनी ‘प्रतीत्य’ शब्दात शाश्वत दृष्टी आणि ‘समुत्पाद’ शब्दात उच्छेदवादी दृष्टीचे खंडण केले आहे असे सांगून प्रतित्यसमुत्पाद मध्यममार्गाचे तत्वज्ञान सांगतो असे म्हटले आहे.

      आचार्य नागार्जुन यांनी प्रतित्यसमुत्पादाला आणि शून्यता यांना एकच मानले आहे. विग्रहव्यावर्तनीमध्ये नागार्जुन म्हणतात की, ज्यांनी शून्यतेला जाणले आहे त्यांनी सर्व लौकिक आणि लोकोत्तर अर्थाला सुध्दा जाणले आहे. कारण ज्यांनी शून्यतेला जाणले आहे, त्याने प्रतित्यसमुत्पादाला जाणले आहे. त्याने चार आर्यसत्यालाही जाणले आहे.

            भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पाद हया  सिध्दांताचा शोध लाऊन मानवाच्या दु:खाच्या निर्मितीची प्रक्रिया अतिशय सोप्या शब्दात आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मांडली आहे. म्हणून त्यांचा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत हा एक अलौकीक शोध आहे. त्यावेळी जी समाजरचना होती, जी विचारधारा प्रचलीत होती, त्या प्रवाहाच्या विरोधात प्रतित्यसमुत्पादा द्वारे त्यांनी आपल्या एका नवीन धम्माची  आणी  तत्वज्ञानाची  प्रतिष्ठापना केली. 

      प्रतित्यसमुत्पाद हा सिध्दांत केवळ दु:खापुरताच मर्यादित नाही, तर तो विश्वातील सर्व गोष्टींना लागू  पडतो. 

            याच सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने सृष्टीचा निर्माता म्हणून इश्वराला नाकारले. तसेच ईश्वराच्या अस्तित्वाला व आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला सुध्दा नाकारले.  कोणीही जग शून्यातून निर्माण करु शकत नाही व कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही तर ती कारणाने निर्माण होत असते. त्यामुळे सृष्टीचा निर्माता ईश्वर, देव वगैरे सर्व कल्पना खोट्या आहे.  सर्व विश्व प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारणभावाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.

      भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध धर्माशी जोडला आहे. भगवान बुध्दाने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर आणि आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला. वासेठ्ठ आणि भारद्वाज या ब्राम्हणाशी झालेल्या चर्चेत बुध्दाने ईश्वराविषयी त्यांचे मत स्पष्ट केले आहे. बुध्दाच्या मते या जगात खूनी, चोर, डाकू, लुटारु, व्यभिचारी, व्यसनी, फसवे, असे अनेक तर्‍हेचे लोक असतात. जर ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्‍तीमान आणि सर्वव्यापी आहे तर तो एकतर या सर्व गोष्टीमध्ये तोच विद्यमान आहे अथवा अशा अनिष्ट गोष्टीचा तो पुरस्कर्ता तरी आहे. असेही नसेल तर अशाप्रकारचा ईश्वर आंधळा तरी आहे. सृष्टी ही ईश्वरनिर्मित नसून ती उत्क्रांत झाली आहे असे त्यांचे ठाम मत होते. भगवान बुध्दानी ईश्वराचे स्थान `सदाचार व नितिला ’ दिले आहे.

            भगवान बुध्दाने पुनर्जन्माला अवतार (Incarnation)  म्हणून नाही तर पुनर्निमिर्ती म्हणून मानले.  त्यानी शरीराचे चार घटक म्हणजे  पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यांचे पुनर्जन्म मानले, आत्म्याचे नाही. 

      प्रतित्यसमुत्पाद सिध्दांतात भगवान बुध्दाने दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा करता येईल याचा शोध घेतला. प्रतित्यसमुत्पादाचा शोध लावल्यामूळे सिध्दार्थ गौतमाला बुध्दत्व प्राप्‍त झाले. ज्ञानप्राप्‍तीच्या रात्री पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रहरी भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पादाचाच विचार केला.

      प्रतित्यसमुत्पाद हा बारा कड्‍याचा सिध्दांत आहे. ज्या प्रकारे एखाद्या चक्राला अनेक आरे असतात आणि ते चक्र आर्‍यासहित गोलाकार फिरत राहते. त्याचप्रमाणे हे भवचक्र बारा आर्‍यांचे बणले असून ते अखंडपणे फिरत राहते.

        सिध्दांतानुसार अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरुप (मन आणि शरीर), नामरुपामुळे षडायतन (सहा ईद्रीये), षडायतनामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान (चिकटून राहणे), उपादानामुळे भव (होणे), भवमुळे जाती (जन्म), जातीमुळे जरा (वार्धक्य), मरण, शोक उत्पन्न होतात. अशा तर्‍हेने अविद्येपासून ते  जरा, मरण पर्यंत दु:खाचा उगम होणार्‍या बारा कड्यांना अनुलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा उगम कसा होतो हे अनुलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे.  .

      तसेच अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो. संस्काराच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाच्या निरोधाने नामरुपाचा निरोध होतो. नामरुपाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध होतो. स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध होतो. वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध होतो. तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध होतो. उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध होतो. भवाच्या निरोधाने जातीचा निरोध होतो. जातीच्या निरोधाने जरा, मरण, शोक याचा निरोध होतो. याप्रमाणे दु:खाचा निरोध होतो. अशा तर्‍हेने अविद्येपासून ते  जरा, मरण पर्यंत दु:खाचा निरोध करणार्‍या बारा कड्यांना प्रतिलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा निरोध कसा होतो हे प्रतिलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे.

       दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा होतो याची कारणमिमांसा प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार भगवान बुध्दाने याप्रमाणे समजावून सांगितला आहे.

      प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत सांगतांना अविद्येपासून सुरुवात केली आहे. परंतु अविद्या हे दु:ख निर्मितीचे मूळ कारण आहे असे म्हणता येणार नाही. जगातील प्रत्येक गोष्टीचा उगम दुसर्‍या कोणत्या तरी समुत्पादाच्या गोष्टीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार जगात कोणतेच मूळ कारण असु शकत नाही, अविद्या म्हणजे जग जसे तसे न पाहणे, म्हणजेच दु:ख आर्यसत्याविषयी संपुर्ण ज्ञान नसणे. ज्याला आर्यसत्याविषयी संपुर्ण ज्ञान आहे. त्याच्याकडून संस्कार उत्पन्न होणार नाही, त्याच्यात तृष्णा उत्पन्न होणार नाही. म्हणजेच तो दु:खातून मुक्त होईल.

      कोणत्याही गोष्टी प्रत्ययाशिवाय म्हणजे कारणाशिवाय होत नसते. कारणामुळे जे कार्य होते ते आपल्या परीने दुस‍र्‍या कार्याचे कारण होते. आणि ते दुसरे कार्य आपल्या परीने तीस‍र्‍या कार्याचे कारण होते. अशा तर्‍हेने कार्यकारन भावाचे चक्र अव्याहतपणे चालू असते. वस्तुमात्रांतील परस्परसंबंध हे प्रतित्यसमुत्पादाचे मुळ स्वरुप आहे. कोणतीही वस्तु स्वयंसिध्द नसते. तिचे अस्तित्व संबंधजन्य असते. यावरुन असे लक्षात येईल की, जगात कोणत्याही गोष्टीला पहिले कारण नसते. कारण प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार कोणतेही अस्तित्व हे त्याच्या कारणामुळे अस्तित्वात आलेले असते. शिवाय कार्याला एकच कारण असते असेही नाही, तर बहुतांश वेळेला अनेक कारणांच्यामुळे कार्य घडत असते. म्हणून प्रतित्यसमुत्पादाचे हे सिध्दांत नीट समजल्यावर  असे  लक्षात येईल की, जगात शून्यातून काहीच निर्माण होत नाही. त्यामुळे ईश्वराला शून्यातून जग निर्माण करणे शक्य नाही. प्रत्येक कार्य हे कारणावरच अवलंबून असल्यामुळे जगावर अधिकार चालविणार्‍या ईश्वराचे काहीच काम नाही. जर ईश्वर असेलच तर तोही कोणत्यातरी कारणामुळे उत्पन्न झाला असला पाहिजे. कारण तो स्वयंभू असणे शक्य नाही. कार्यकारण भावामुळे जगात चमत्काराला वाव नाही. म्हणून बौध्द धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला काहीच स्थान नाही. बौध्द धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला मानले जात नाही. ब्रम्ह हे विश्वनुर्मितीचे कारण  असू शकत नाही. बी पासून झाड उत्पन्न होते. त्याचप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणांमुळे अस्तित्वात येत असतात. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रम्ह, आत्मा, देव असे कोणीही अस्तित्वात असू शकत नाही. आपण केलेया कृत्याचे बरे वाईट परिणाम घडत असतात. थोडक्यात म्हणजे सर्व विश्वच प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.

      बौध्द धम्मात भवचक्र किंवा संसारचक्र, कर्म आणि पुनर्जन्म यांचा संबंध दु:ख आर्यसत्याशी जोडला आहे.

१) अविद्या

      प्रतित्यसमुत्पादाची पहिली कडी म्हणजे अविद्या.

            अविद्या म्हणजे चार आर्यसत्याचे अज्ञान. या चार आर्यसत्याचे यथार्थ ज्ञान नसणे. अशा अविद्य लोकांना त्यांच्या मनाविषयी व शरीराविषयी तीन प्रकाराचे भ्रम निर्माण होत असतात.

      आपले शरीर आणि मन म्हणजे मी, माझे व माझा आत्मा’ हे भ्रम वाढत गेल्यावर हव्यास निर्माण होतो. हा हव्यास वाढल्यानंतर वर्तमानातील आणि भविष्यातील जीवनक्रम घडविणारी कृत्ये घडत असतात.

२) संस्कार

      प्रतित्यसमुत्पादाची दुसरी कडी म्हणजे संस्कार. अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात.

      ज्यांना चार आर्यसत्याचे यथार्थ ज्ञान झाले त्यांची प्रज्ञा विकसित होत असते. ते जग जसे आहेत तसे पाहतात. अज्ञान नष्ट होते. अविद्या नष्ट होऊन त्यांचे संस्कारही नष्ट होतात. ते असंस्कारीत होतात. त्यांना निर्वाण प्राप्‍त होते.

      संस्कार म्हणजे कृत्य करणे, योजना करणे, काम करण्यासाठी हालचाल करणे की ज्यामुळे त्या  कृत्याचा, योजनेचा कामाचा परिणाम नैतिक दृष्ट्या चांगला किंवा वाईट, कुशल किंवा अकुशल, पुण्यमय किंवा पापमय होत असतो. चांगल्या अथवा वाईट कृत्याचा झालेला परिणाम म्हणजेच संस्कार. संस्कार आपल्या वर्तमान आणि भविष्यातला शारीरिक, वाचिक आणि मानसिक सर्व कृत्याचा जीवनक्रम ठरवीत असतात.

      अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो..

३) विज्ञान

      प्रतित्यसमुत्पादाची तिसरी कडी म्हणजे विज्ञान. संस्कारामुळे विज्ञान उत्पन्न होतात.   

       विज्ञान म्हणजे जाणणे, निरनिराळ्या प्रकारे अनुभूती घेणे. आपण आपल्या पांच ईंद्रियाद्वारे आणि मनाद्वारे निरनिराळ्या प्रकारची अनुभूती घेत असतो. जसे आपण आपल्या डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणत असतो. कानाद्वारे आवाज जाणत असतो. नाकाद्वारे वास जाणत असतो. जिभेद्वारे चव जाणत असतो. त्वचेद्वारे स्पर्श जाणत असतो. आणि मनाद्वारे कल्पन्ना आणि विचार जाणत असतो. अशा तर्‍हेने विज्ञान सहा प्रकारचे आहेत. चक्षू विज्ञान, कर्ण विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, स्पर्श विज्ञान आणि मनो विज्ञान. तसेच ज्याचा परिणाम कुशल कर्मात होतो व ज्याचा परिणाम अकुशल कर्मात होतो अशा प्रकारचे दोन विज्ञान आहेत. दृश्य आकृती आणि रंग, आवाज इत्यादी इंद्रिय विषय असले आणि त्याचा संबंध अनुक्रमे डोळे, कान इत्यादी इंद्रियांशी आला तरच विज्ञान जागृत होते, इतर वेळी नाही. त्याचप्रमाने कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय मनात आले तरच मनिंद्रिय विज्ञान जागृत होते, ह्यावरुन असे स्पष्ट होते की इंद्रिय आणि विषयाचा एकमेकांशी संबंध आलाच तर विज्ञान जागृत होते. जसे आपण पुस्तक वाचत असतांना आपले मन जर दुसरीकडे गुंतले असेल तर उघड्या डोळ्यांनी आपण केवळ पुस्तकाकडे पाहत असतो. परंतु त्यात काय लिहिले आहे ते आपल्या लक्षात येत नाही. कारण त्यावेळी आपले च्क्षुंद्रियविषय विज्ञान जागृत नसते. म्हणून इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियाच्या विषयाचा एकमेकांशी संबंध असतो. ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणूनच विज्ञान सुध्दा शाश्वत नाही तर ते क्षणाक्षणाला बदलत असतात.

      संस्काराचा निरोध केला असता विज्ञानाचा निरोध होतो.  

४) नाम-रुप

      प्रतित्यसमुत्पादाची चवथी कडी म्हणजे नामरुप. विज्ञानामुळे नामरुप उत्पन्न होतात.         

      नाम म्हणजे मन व रुप म्हणजे शरीर. नाम (मन)  हे चार खंडाचे बनलेले आहे. ते म्हणजे १) विज्ञान (Consciousness जाणीव), २) संज्ञा (Perception आकलन), ३) वेदना (Sensation संवेदना, अनुभूती) व ४) संस्कार (Reaction प्रतिक्रिया).

      मनाच्या माध्यमातून एखाद्यी प्रक्रिया कशी घडत असते याचे उदाहरण म्हणजे- समजा रस्त्यात एखादी वस्तु दिसली तर ते पाहण्याची क्रिया डोळ्यांनी करताच काहितरी आहे याची  याची जाणिव (विज्ञान) होते. त्यापाठोपाठ लगेच दुसरी क्रिया घडते ती म्हणजे  नक्किच भयावह साप आहे याचे आकलन (संज्ञा) होते. ते पाहून भितीदायक संवेदना (वेदना) निर्माण होते. लगेच प्रतिक्रिया (संस्कार) उत्पन्न होते की आपण तेथून दुर जायला पाहिजे अन्यथा तो साप जर चावला तर आपला मृत्यू ओढवेल.

            रुप (शरीर) हे पांच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने क्रियाशील राहत असून त्यांच्यामुळेच बाह्य जगाशी संबंध प्रस्थापित होत असते. ते पांच इंद्रिय म्हणजे १) डोळा, २) नाक, ३) कान, ४) जीभ, व ५) त्वचा ही होत. या पांच इंद्रियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पांच बाबीचे ज्ञान मानवास होते. डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणणे, नाकाद्वारे गंध जाणणे, कानाद्वारे आवाज जाणणे, जिभेद्वारे चव जाणणे, व त्वचेद्वारे स्पर्श जाणणे.

       तसेच रुप (शरीर) हे १) पृथ्वी, २) पाणी, ३) अग्नी आणि ४) वायू या चार घटकांचे बनलेले आहेत  आणि हे चार घटक सृष्टीमध्ये निसर्गत:च विद्यमान असतात.

       भगवान बुध्दांनी रुप आणी नाम या घटकांवर लक्ष केंद्रित करुन चिंतन केले आणि सत्याचा शोध घेतला. त्यांनी या नामरुपाच्या जडण-घडणीची सूक्ष्म पातळीवर अंतर्मुख होऊन चिकित्सा केली. वरकरणी जड घटकांचे बनलेले हे शरीर (रुप) भरीव भासत असले आणि त्या आधारावर क्रिया करणारे हे मन (नाम) वरवर स्थूल भासत असले तरी ते शरीर अगदी सूक्ष्म सुक्ष्म परमाणूचे बनलेले आहे. याचा शोध सर्वप्रथम भगवान बुध्दांनी लावला. एवढेच नव्हे तर हे सारे मन आणी शरीर क्षणाक्षणाला अतिसूक्ष्म प्रमाणात अत्यंत शिघ्रगतीने सतत बदलत आहे; उत्पन्न होत आहे; नष्ट होत आहे. हे भगवान बुध्दांना दिसले. यालाच त्यांनी अनित्य म्हटले आहे.

      आधुनिक शास्त्रज्ञांनी हे अंतिम सत्य मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर इसवी सन सहाव्या शतकापूर्वी भगवान बुध्दांनी मांडलेले बरेच सिध्दांत आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात मांडले आहे.

            या नामरुप प्रवृती मानवामध्ये दु:निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरत असतात.  आपल्या मनावर बालपणापासून निसर्गात आणि आजुबाजूला घडणार्‍या अनंत घटनाच्या संग्रहाचा स्तर चढलेला असतो.  बाह्य जगात  घडणारी घटना आपले मन त्यामध्ये संग्रहीत जुन्या संस्काराशी  ताडुन पाहत  असते व त्यानूसार प्रतिक्रिया व्यक्‍त करीत असते. या मनात अनेक प्रकारचे विकार संग्रहीत झालेले असतात. अर्थात प्रत्येकाचे मन अशुध्द व मळलेले असतात. जोपर्यंत कोणत्याही व्यक्‍तीला स्वत:च्या मनातील मळ व अशुध्दता दिसणार नाही,  तो पर्यंत तो ते मळ व अशुध्दता शुध्द करण्याच्या फंदात पडणार नाही. जेव्हा मन नितांत निर्मळ  होइल,  परिशुध्द होईल तेव्हाच त्या मनावर नविन संस्कार रुजल्या जातील.

      विज्ञान हे  परिवर्तनशील आहे. त्या परिवर्तनशीलतेच्या तत्वामुळेच नामरुप  हे नेहमी बदलणारे तत्व ठरते. 

      विज्ञानाचा निरोध केला असता नामरुपाचा निरोध होतो.  

५)  षडायतन

            प्रतित्यसमुत्पादाची पांचवी कडी म्हणजे षडायतन. नामरुपामुळे षडायतन उत्पन्न होतात.

      षडायतन म्हणजे सहा आयतने. ते म्हणजे डोळा, कान, नाक, जिभ,  त्वचा आणि मन.

      येथे डोळ्याचे आयतन म्हणजे पाहण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  कानाचे आयतन म्हणजे ऎकण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  नाकाचे आयतन म्हणजे वास घेण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  जिभेचे आयतन म्हणजे चव घेण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  त्वचेचे आयतन म्हणजे स्पर्श जाणण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  मनाचे आयतन म्हणजे कल्पना, विचार जाणण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता. 

      नामरुपाचा निरोध केला असता षडायतनचा निरोध होतो.  

६) स्पर्श

      प्रतित्यसमुत्पादाची सहावी कडी म्हणजे स्पर्श. षडायतनामुळे स्पर्श उत्पन्न होतात.

      जेव्हा चक्षूरुप आणि चक्षूविज्ञान यांचा संबंध येतो तेव्हा त्या संबंधाला

स्पर्श असे म्हणतात. स्पर्श म्हणजे ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय  विज्ञान यांचा समन्वय होणे.

      पांच इंद्रियांच्या क्रियेला मनाने दिलेले आदेश यांच्या परस्पर संबंधातून आपण बाह्यजगाशी संपर्क प्रस्थापित करीत असतो. जसे आपण जर पुस्तकातील अक्षरांकडे पाहिले तर नेत्रस्पर्श, कानाला  कुणाचा आवाज ऎकू आला तर कर्णस्पर्श,  नाकाला कसलातरी गंध आला तर घ्राणस्पर्श, काही खात असतांना  जिभेला चव कळली तर जिव्हास्पर्श,  त्वचेला कसलातरी संपर्क आला तर त्वचास्पर्श असे या पांचही इंद्रियाला त्या त्या विषयाचा स्पर्ष होत असतो.  या सर्व क्रियावर मनाचे अधिराज्य असते. मन जर नसेल तर कोणताही स्पर्श जाणवणार नाही.

      षडायतनचा निरोध केला असता स्पर्शाचा निरोध होतो.  

७) वेदना

      प्रतित्यसमुत्पादाची सांतवी कडी म्हणजे वेदना. स्पर्शामुळे वेदना उत्पन्न होतात.

       वेदना म्हणजे इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी  संपर्क आला असता जाणवणारी अनुभूती. एखाद्या बाह्यस्थितीचा आपल्या ज्ञानेंद्रियाला स्पर्श होताच जे तरंग शरीरात निर्माण होतात ते म्हणजेच वेदना. वेदना कशी निर्माण होते ते मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे.

      वेदना तीन प्रकारच्या आहेत.  सुखमय वेदना, दु:खमय वेदना व  सुखमय व दु:खमय वेदना.

      एखादे रुप पाहिल्याने, आवाज ऎकल्याने, वास घेतल्याने, चव घेतल्याने, स्पर्श केल्याने व मनांत कल्पना किंवा विचार आल्याने संवेदना निर्माण होत असतात. त्या सहा प्रकारच्या  संवेदना डोळा, कान, नाक, जिभ,  त्वचा आणि मन अनुभवत असतो.  जेव्हा ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय  विज्ञान यांचा समन्वय झाल्याने स्पर्श होतो,तेव्हाच संवेदना निर्माण होत असतात. म्हणून  स्पर्शामुळे वेदना निर्माण होत असतात.

      स्पर्शाचा निरोध केला असता वेदनेचा निरोध होतो.  

८) तृष्णा

      प्रतित्यसमुत्पादाची आठवी कडी म्हणजे तृष्णा . वेदनेमुळे तृष्णा उत्पन्न होते.

      रुप, काम, मैथून, शब्द, गंध,रस, स्पर्श इत्यादी लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी युक्‍त असलेली भावना म्हणजे . तृष्णा होय.  तृष्णेमुळे दु:खाची निर्मिती होत असते.  मोह किंवा अविद्येमुळे आपण कोणत्याही वेदनेवर लोभाची किवा द्वेशाची प्रतिक्रिया व्यक्‍त करित असतो. यालाच तृष्णा म्हणता येईल.

      एखादी न आवडणारी व्यक्‍ती, वस्तू किंवा स्थिती आपल्यासमोर आली तर ती नकोशी वाटून आपण त्याचा द्वेष करायला लागतो. मनातील संस्कार  नकाराची भावना व्यक्‍त करतात. याच भावनेने आपण दु:खी होत असतो.

      किंवा याच्या उलट एखादी आवडणारी व्यक्‍ती, वस्तू किंवा स्थिती आपल्यासमोर आली तर ती आपल्याला हवी-हवीशी वाटून आपण त्याचा लोभ करायला लागतो. मनातील संस्कार  आवडल्याची भावना व्यक्‍त करतात. याच लोभाच्या, आसक्‍तीच्या भावनेने क्षणीक सुख मिळते. परंतु ती दुर गेली की आपण दु:खी होत असतो. अशा तर्‍हेने एखादा तिरस्कार, घृणा किंवा आसक्‍ती यांच्या हव्यासामुळे दु:खाचे कारण बनते.  मोह म्हणजे अज्ञान किंवा अविद्या यमुळेच हे लोभ,द्वेशाचे चक्र सुरु राहते.

      वेदनेचा निरोध केला असता तृष्णेचा निरोध होतो.  

९) उपादान

      प्रतित्यसमुत्पादाची नववी कडी म्हणजे उपादान. तृष्णेमुळे उपादान उत्पन्न होते.

      उपादान म्हणजे घट्ट पकडून ठेवणे. जरी एखाद्या घट्ट पकडून ठेवलेल्या गोष्टीपासून त्रास, कष्ट, दु:ख होत असले तरी ती गोष्ट न सोडणे.

            तृष्णेचा हळूहळू आपल्या मनात संचय वाढत जातो. त्यामुळे त्याची मनावर घट्ट पकड बसते. तृष्णेच्या याच संचयाला उपादान म्हणतात. तृष्णेच्या संग्रहाने अर्तात उपादानाने प्रभावित होऊन मनुष्य पुढिल कर्म करीत असतो. उपादान चार प्रकाराचे आहेत.      पहिले कामउपादान म्हणजे सर्व प्रकारच्या आनंद देणार्‍या, सुख देणार्‍या, आवडणार्‍या आणि लैंगिक समाधान देणार्‍या गोष्टीसंबंधी अत्यंत पराकोटीचे आकर्षण असणारी विचारसरणी.

      दुसरे दृष्टीउपादन म्हणजे असा विश्वास की, ‘हे एकच बरोबर आहे व बाकीचे चुकीचे आहे’ असा एकांगीपणाची विचारसरणी.

      तिसरे उपादान म्हणजे कर्मकांडाने मनुष्य पवित्र होतो, त्याच्यावर कोणतेही संकट येणार नाहीत किंवा आलेल्या संकटाचे निवारण होईल, त्याला भौतिक लाभ होईल, त्याला सुख मिळेल अशा प्रकारची विचारसरणी.

      चवथे सत्कायदृष्टी उपादान म्हणजे ‘मी’, ‘माझे’, ‘माझा आत्मा’ अशी आत्मभावाचे दृष्टी व नेहमी बदलत  असणार्‍या जगाला न बदलणारे आहे, आत्मा कायम टिकणारा आहे अशी धारणा बाळगणारी विचारसरणी. 

      तृष्णेचा निरोध केला असता उपादानाचा निरोध होतो.

१०) भव

      प्रतित्यसमुत्पादाची दहावी कडी म्हणजे भव. उपादानमुळे भव उत्पन्न होते.

      भव म्हणजे अस्तित्वात येणे. तृष्णेच्या संग्रहाने अर्थात उपादानाने प्रभावित हॊवून मानव पुढील कर्म करीत असतात. त्या कर्माचा परिपाक म्हणजेच ‘भव’ होय. भव म्हणजे चित्ताचे असे कर्म की ज्यामुळे फळाची उत्पत्ती होते. अर्थात हे भव म्हणजे कर्म पुन्हा उत्पन्न होण्याची, जन्म घेण्याची ईच्छा निर्माण करते.

      कम्म आणि विपाक असे भवाचे दोन पैलू आहेत. कम्म म्हणजे कर्म जी मनुष्याकडून कायेने, वाचेने व मनाने कुशल-अकुशल, पापमय-पुण्यमय, अध्यात्मिक आणि वैचारिक कृत्ये केली जातात ती. अशी कृत्ये की, ज्यामुळे त्याचेवर संस्कार घडत असतात किंवा त्याचा भविष्यातील जीवनक्रम घ्डवीत असतात. विपाक म्हणजे त्या कर्माचा परिणाम.

      कम्माबाबत भगवान बुध्द म्हणतात की, ‘समाजामध्ये नैतिक व्यवस्था सांभाळण्याचे काम कम्म नियम करीत असतात. समजामध्ये नैतिक व्यवस्था चांगली आहे याचा अर्थ मनुष्य कुशल कर्म करीत आहे. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर याचा अर्थ मनुष्य अकुशल कर्म करीत आहे. भगवान बुध्द कर्म सिध्दांतावर इतका जोर देत असत की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्म सिध्दांताच्या दृढ पालनाशिवाय नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे कम्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. कम्म नियमात जसे दिवसामागून रात्र येते तसे कर्मामागून त्याचा परिणाम येत असतो. म्हणून ‘कराल तसे भराल’ असे सांगणारे भगवान बुध्द पहिलेच आहेत. 

      कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करण्याला मिळत असतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुध्दाचा उपदेश असा की, ‘असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करु नका. कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दु:खी होते.’ कर्माचा विपाक म्हणजे परिणाम कर्त्याला भोगावे लागतात. कधी कधी एकाच्या कर्माचा परिणाम दुसर्‍यालाही भोगावे लागतात. त्यामुळे नैतिक व्यवस्थेत बाधा निर्माण होते.

      आपल्या मनात ईच्छा निर्माण होणे हे मनाची एक वृती आहे. इच्छा निर्माण झाली की त्याच्या पूर्ततेसाठी मनूष्य मनाने, वाणीने व कायेने कर्म करीत असतो. बुध्द धम्मानूसार मनूष्याची इच्छा ही अगदी स्वतंत्र असून ती पूर्वी केलेल्या कर्मावर अवलंबून नसते. कर्म हे बीज आहे तर त्याचे फळ म्हणजे कर्मविपाक आहे. इच्छा ही कर्माप्रमाणे कुशल किंवा अकुशल असू शकते. इच्छा, त्यानंतर कर्म आणि कर्मानंतर कर्मविपाक असा कार्यकारणाचा खेळ अव्याहतपणे चालू असते. यालाच जीवन किंवा संसार म्हटले जाते.

      जरी आपल्या हातून अपघाताने, चूकीने, अज्ञानाने, गैरसमजुतीने किंवा अन्य कोणत्याही कारणाने अकुशल कर्मे घडली असेल तर ह्या क्षणापासून जागृत राहून कुशल कर्मे करण्यास सुरुवात करावी. राहिलेल्या आयुष्यात आपण जेवढे जास्त कुशल कर्मे करु तेवढ्‍यामुळे अकुशल कर्माचा जोर कमी अथवा अगदी नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून मागे केलेल्या अकुशल कर्मांनी हताश व निराश न होता मनूष्याने ध्येर्याने जास्तीत जास्त कुशल कर्मे करावीत म्हणजे त्याचे जीवन मंगलदायी होऊन समाजालाही फायदा होईल. मनूष्याने सतत जागृत राहून कुशल कर्मे करीत राहावीत अशी भगवान बुध्दांची शिकवण आहे.

      म्हणूनच भगवान बुध्दाच्या धम्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे  स्थान आहे ते नीतीला दिले आहे.

      उपादानाचा निरोध केला असता भवाचा निरोध होतो.

११) जाति

      प्रतित्यसमुत्पादाची अकरावी कडी म्हणजे जाति. भवामुळे जाति उत्पन्न होते.

      जातिचा अर्थ म्हणजे पंचस्कंधाचे प्रगट होणे. पंचस्कंध म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांचे प्रगटीकरण म्हणजेच जाति होय.

            भवाचा निरोध केला असता जातिचा निरोध होतो.

१२) जरा-मरण

      प्रतित्यसमुत्पादाची बारावी कडी म्हणजे जरा-मरण. जरा (म्हातारपण), व्याधी (आजारपण), मरण (मृत्यु), शोक (शोक व्यक्त करणे), परिदेव (रडणे, ओरडणे), दु:ख (शारिरीक दु:ख), दौर्मनस्य (मानसिक दु:ख), उपायास (हैराण होणे, परेशान होणे इत्यादी जातिमुळे म्हणजे जन्मामुळे उत्पन्न होते.

            मनूष्य जन्माला आल्यानंतर त्याला बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत जीवन प्रवास करावा लागतो. आयूष्याच्या शेवटी-शेवटी त्याला म्हातारपणाच्या अवस्थेत जावेच लागते. उदय होणे आणि लय होणे ही प्रक्रिया शरीराच्या अणु-रेणूत अव्यातपणे चाललेला असतो. क्षणैक परिवर्तनामुळेच दिर्घकालीन परिवर्तन घडून येत असते. मनाचे परिवर्तन तर फार तिव्रतेने घडत जात असते. म्हणूनच भगवान बुध्द म्हणतात की, ‘ भिक्खुंनो मनाइतके बदलणारे, परिवर्तनशील दुसरी कोणतीच गोष्ट मला दिसत नाही. शरीरातील बदल आपल्याला दृश्य स्वरुपात दिसून येते.

      ‘जन्म, जरा, मरण हे जीवनातील सर्वात महत्वाचे घटक आहेत. ते जर नसते तर बुध्दांचा जन्मच झाला नसता. जन्म, जरा, मरण आहेत म्हणून बुध्दांचा जन्म झाला आहे,’ असे भगवान बुध्दांनी म्हटले आहे.

      ज्यांना जन्म, जरा, मरण माहिती नाही, त्यांना जरा, मरणाचा निरोध कसा करावा ते कळणार नाही.

      प्रतित्यसमुत्पादाच्या निरनिराळ्या हेतूचा, निदानांचा व प्रत्ययांचा मूळ उद्देश म्हणजे जन्म, जरा मरणाला जाणने, प्रज्ञेद्वारे त्याचा वेध घेणे, अविद्या असल्यामुळे कर्माची निर्मिती होत असते. जर अविद्या नष्ट झाली तर कर्माची निर्मिती होणार नाही. जर कर्म नसेल तर जन्माची निर्मिती होणार नाही. जर जन्म नसेल तर जरा-मरणाची निर्मिती होणार नाही. अशा प्रकारे प्रतित्यसमुत्पाद निर्वाणाच्या मार्गाने घेऊन जातो.

      जातिचा निरोध केला असता जरा-मरण, शोक, दु:खाचा निरोध होतो.

      अशा प्रकारे प्रतित्यसमुत्पादाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर जग जसे आहे तसे पाहता येते. त्यामुळे चार आर्यसत्याचा अर्थ निट कळून येते.

      भगवान बुध्दांच्या प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतामुळे समाजाची होणारी अधोगती थांबली. त्यामुळे समाज हळूहळू सुसंस्कृत बनत चालला. भगवान बुध्दांच्या काळी मिथ्या दृष्टीमुळे नरबळी, पशुबळी, स्त्री हत्या, बालहत्या, सतीप्रथा असे चालत असलेले रानटी प्रकार बंद होत गेले. स्वत:च्या फायद्यासाठी दुसर्‍याची हत्या करणे, यज्ञामध्ये पशुंचा बळी घेणे, देवदासीप्रथेद्वारे स्त्रियांचे लैगिंक शोषण करणे, जातीभेद करणे, अमानूष अश्पृष्यता पाळणे      इत्यादी प्रकार मिथ्यादृष्टीमुळे, अज्ञानामुळे सर्रासपणे पाळल्या जात होते. त्यात वावगे काहीच नाही, कारण ते देव निर्मित-धर्म निर्मित आहे असे त्यांची मिथ्यादृष्टी होती. मात्र भगवान बुध्दांच्या शिकवणूकीमुळे नैतिकतेच्या शिकवणूकीचे महत्व लोकांना कळू लागले. चांगले कर्म केले तर त्याचे चांगले परिणाम होतात. वाईट कर्म केले तर त्याचे वाईट परिणाम होतात हे लोकांच्या लक्षांत आले. म्हणून भगवान बुध्दांनी ईश्वराऎवजी नैतिकतेला आपल्या शिकवणूकीत महत्वाचे स्थान दिले आहे.

      प्रतित्यसमुत्पादाची साखळी तिन काळांमध्ये विभाजीत केल्या जातात. अविद्या आणि संस्कार हे भूतकाळाशी संबंधीत आहे.  विज्ञान हे वर्तमान काळ आणि भूतकाळ यांना जोडते. नामरुप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान आणि भव हे वर्तमान काळाशी संबंधीत आहेत. जाती (जन्म), जरामरण (दु:ख समूह) हे भविष्य काळात उद्‍भवत असतात.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात दुसर्‍या प्रकारची प्रतित्यसमुत्पादाची प्रक्रिया सांगितली आहे. ते म्हणतात, ‘तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाची ओढ काम व लालसा उत्पन्न करते.. काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे, त्याची सुरक्षा करणे आवश्यक होते. मालमत्तेच्या रक्षण करण्याच्या वृतीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य.कथन ही प्रतित्यसमुत्पादाची अनुलोम साखळी होय.

      प्रतित्यसमुत्पादाची प्रतिलोम साखळीप्रमाणे जर तृष्णाच नसेल तर लोभाची ओढ लागणार नाही. लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होणार नाही. विकार नसतील तर दृढता निर्माण होणार नाही. दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होणार नाही. स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण नाही. स्वामित्वाची भावना नसेल तर तेथे शांती निर्माण होईल. अशा तर्‍हेने संग्राहकवृतीचे दुष्परिणाम भगवान बुध्द स्थवीर आंनदाला समजावून सांगतात.

      सिध्दार्थ गौतमाला ज्ञान प्राप्‍तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असतांना

त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या.

      नव्या प्रकाशाच्या प्राप्‍तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते; परंतु ते कसे नाहिसे करावे याचा मार्ग मात्र सांगितला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्‍नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्‍न विचारला की, “व्यक्‍तिमात्राला भोगाव्या लागणार्‍या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ?” त्यांचा दुसरा प्रश्‍न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ?” या दोन्हिही प्रश्‍नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त गौतम बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.

      तथापी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्‍न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्‍नात ते म्हणतात की, “चार आर्य सत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? कारण हे चार आर्यसत्य बुध्दांच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.” त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय ? या प्रश्‍नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे  असे पहिल्या आर्यसत्यात  भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ?” भगवान बुध्द दुसर्‍या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. म्हणूनच  त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल ?

      सिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्‍त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्‍तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दाचे उपदेश या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्‍या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून  घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक  आहे.  त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते. भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजकांना सारनाथ येथे या चार आर्यसत्यांचा उपदेश केला.

      भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.

      दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे.  म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे.आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख  होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे.

      दु:ख  समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख  कां होते? त्याला दु:ख कां भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे.  अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो.

       परंतु दु:ख  हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मिच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या  कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख  होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद हया  सिध्दांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्‍त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा  असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते.  तृष्णा आहे म्हणून दु:ख  आहे. तृष्णा नसेल  तर दु:खही राहणार नाही.

      तृष्णा तीन प्रकारची आहे.  कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.

      कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्‍तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधिही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्‍या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो.

      भवतृष्णा म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी बाळगणे म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किवा पुन:पुन्हा जन्म घेण्याची लालसा. या लालसेमूळे जगाच्या दु:खात मोठी भर पडली आहे. शंभर वर्षे जगूनही मनुष्य अतृप्तच राहतो. मरणाला माणूस भित असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, शंभर वर्षे शेळी हो‍ऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा !

      विभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा, प्या आणि मजा करा कारण उद्या मरणारच आहे, अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांध बनतात आणि शेवटी दु:ख ओढवून घेतात.

      दु:खनिरोध हे तिसरे आर्यसत्य होय. दु:खनिरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजेच  तृष्णेपासून मुक्‍ती, तृष्णेचा नाश करणे. तृष्णेचा क्षय करणे. ज्याला निर्वाण प्राप्‍त झाले तो तृष्णेपासून मुक्‍त होतो. म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मोह राहत नाही. तृष्णेमुळे लोभ निर्माण होते. एखादी गोष्ट त्याला आवडायला लागली की, तो त्यावर आसक्‍त होतो. तिचा लोभ धरतो. पण तिच गोष्ट त्याला मिळाली नाही की, त्याचा द्वेष करतो. प्रत्येक गोष्ट हे अनित्य असते, असे भगवान बुध्दांनी सांगितले आहे. त्या गोष्टीचे अनित्य असलेले खरे स्वरुप न कळल्यामुळे त्याला मोह किवा भ्रांती होते. अशा तर्‍हेने तो लोभ, द्वेष, मोहाला बळी पडून दु;ख ओढवून घेतो.

      दु:ख  निरोधगामिनी प्रतिपदा हे चवथे आर्यसत्य होय. दु:ख  निरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुध्दाची फार महत्वाची शिकवण आहे. दु:ख  निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दु:खाचा निरोध करणार्‍या दिशेने घेऊन जाणारा मार्ग. या मार्गानेच दु:खाचा निरोध होऊ शकतो.

      जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, “दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर  धम्माचा पाया असेल  तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा” . तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, “माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा  व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल.”

       हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची  व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची  शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणूकीचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेमध्ये केला आहे. अकरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.” बारावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचा अवलंब करीन.” तेरावी ते सतराव्या प्रतिज्ञेमध्ये  पंचशिलाचा अंतर्भाव केलेला आहे. तेरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.” चवदावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी चोरी करणार नाही.” पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी व्यभिचार करणार नाही.”  सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी खोटे बोलणार नाही.” सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी दारु पिणार नाही.” जेव्हा आपण ह्या प्रतिज्ञा घेतो, तेव्हा आपल्याला अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे. तरच खर्‍या अर्थाने आपण त्या प्रतिज्ञेचे पालन  करु शकतो. 

      अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी याचा अंतर्भाव होतो. अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन भाग पडतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे प्रज्ञा मध्ये येते. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शील मध्ये येतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे समाधी मध्ये येतात.  

      दहा पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री याचा अंतर्भाव होतो.

      अशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व ईतरांना धम्मदीक्षा देऊन मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमीवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर  आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेंच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.” 

     टिप:- १.सदर लेख  ’भीमरत्‍न पूणे’ या मासिकात जून २०१० च्या अंकात प्रकाशित झाला.

               २.सदर लेख  दैनिक लोकनायक, मुंबई दि. २२.०३.२०११ च्या  वृतपत्रात  प्रकाशित झाला. 

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी बौध्द धम्माची दिक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी तेथे जमलेल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दिल्यानंतर २२ प्रतिज्ञा वदऊन घेतल्या. त्यातील अकरावी प्रतिज्ञा – मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन, अशी आहे.

      बाबासाहेबांनी धम्मदिक्षेच्या ऎतिहासीक भाषणामध्ये सांगितले की, “बौध्द धम्म स्विकारणारे मला कोणी अंधभक्त नकोत. त्यांना बौध्द धम्मात यायचे आहे, त्यांनी जाणिवेने आले पाहिजे व हा धम्म त्यांनी पटवून घेतला पाहिजे.”

      म्हणून २२ प्रतिज्ञा देण्यामागे लोकांनी बौध्द धम्म पटवून घेतला पाहिजे असा बाबासाहेबांचा उद्देश असावा. पुर्वाश्रमिच्या हिंदू धर्माचे कोणत्याही श्रध्दा, रुढी, परंपरा, संस्कार, आचरण बौध्द धम्मात यायला नको. देव आणि आत्मा नाकारणारा बौध्द धम्म शुध्द स्वरुपात राहावा म्हणूनच बौध्द धम्मात २२ प्रतिज्ञेला महत्वाचे स्थान आहे.

      या २२ तेजोमय किरणांनीच माणवाचे जीवन प्रकाशमय होऊ शकेल व हिंदूत्वाच्या वैचारिक आक्रमणाला धर्मांतरीत बौध्दांना यशस्वीपणे तोंड देणे शक्य होईल, म्हणून या प्रतिज्ञा समजून घेऊन त्यांचा आपल्या जीवनात अंगिकार करुन प्रचार आणि प्रसार करणे हे ’बौध्दमय भारत’ करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

      म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या अकरावी प्रतिज्ञेतील अष्टांग मार्ग म्हणजे काय ते समजून घेणे आवश्यक आहे, तरच आपण त्या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो.

      भगवान बुध्द बोधगयेला चार आठवडे ध्यानमग्न चिंतन करीत असतांना त्यांना ज्ञान प्राप्ती झाली त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्स्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्स्या आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्स्या.

      त्यानंतर भगवान बुध्द त्यांना सोडून गेलेल्या पाच परिव्राजकांना धम्मोपदेश करण्याकरीता सारनाथ येथील इषिपतनच्या मृगदायवनात आले. त्या पाच परिव्राजकांसमोर भगवान बुध्दाने पहिले प्रवचन दिले. त्याला ’धम्मचक्क पवत्तन सु्त्त’ असे म्हणतात.

      या प्रवचनात त्यांनी पहिल्या प्रथम विशुध्दी मार्ग समजावून सांगितला. ते म्हणतात की, “ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत, ही विशुध्दी मार्गाची शिकवण आहे.”

      विशुध्दी मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे म्हणजे पंचशील. १. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे, २. चोरी न करणे अर्थात् दुसर्‍याच्या मालकीची वस्तू न बळकावणे. ३. व्यभिचार न करणे, ४. असत्य न बोलणे व ५. मादक पेय ग्रहण न करणे.

      प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करु शकेल आणि ही पाच तत्वे माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे.

      त्यानंतर त्यांनी सदाचाराचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग समजाऊन सांगितला. अष्टांगिक मार्ग म्हणजे- १. सम्यक दृष्टी, २. सम्यक संकल्प, ३. सम्यक वाचा, ४. सम्यक कर्म, ५. सम्यक आजीविका, ६. सम्यक व्यायाम, ७. सम्यक स्मृती व ८. सम्यक समाधी. 

१. सम्यक दृष्टी

            अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग सम्यक दृष्टी हा आहे. सम्यक दृष्टीचा उद्देश अविद्येचा विनाश करणे हा आहे. मनुष्याला दु:खाचे अस्तित्व आणि दु:खनिरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्य समजणे म्हणजेच सम्यक दृष्टी होय. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. कर्मकांडावर विश्वास न ठेवणे, निसर्ग नियमाविरुध्द कोणतीही गोष्ट न करणे, काल्पनिक अनुमानावर विश्वास न ठेवता वास्तवतेच्या व अनुभवाच्या सिध्दांतावर विश्वास ठेवणे इत्यादी गोष्ठी सम्यक दृष्टीमध्ये येतात. सम्यक दृष्टी आपल्या मनाला योग्य त्या दिशेने घेऊन जाते आणि आपल्या मनाला योग्य वळण लावते.

२. सम्यक संकल्प

            अष्टांगिक मार्गातील दुसरा मार्ग सम्यक संकल्प हा आहे. जीवनातील अत्युच्च ध्येय प्राप्‍तीसाठी सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे आहे. जीवनामध्ये ध्येय प्राप्‍तीचा संकल्प मोलाचे कार्य करतो. इतर धर्मामध्ये ध्येय प्राप्‍तीसाठी ज्याला मिथ्या संकल्प म्हणता येईल  असे देवाची आराधना करण्याचा संकल्प करतात. तथापी भगवान बुध्दांनी साधकाला सम्यक संकल्पाचा जो उद्देश सांगितला तो निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे. निर्वाण हा जीवनातील अत्यंत श्रेष्ट अवस्था आहे. सार्‍या समस्‍येचे मूळ तृष्णा आहे. तृष्णेच्या मागे सारे प्राणी धावत असतात. जीवनामध्ये दु:ख उत्पन्न करणार्‍या राग, द्वेष आणि मोह यामध्ये ते गुरफटून जातात. त्यांना पराजित करण्याचे व त्यातून मुक्‍त होण्याचे कार्य केवळ सम्यक संकल्पामुळे होऊ शकते. दु:खाचे मुळ तृष्णा आहे. निर्वाण तृष्णेचा नाश करतो. तृष्णेचा नाश करण्याचे कार्य सम्यक संकल्पच करु शकते. म्हणून मिथ्या संकल्पाऎवजी भगवान बुध्द सम्यक संकल्पाकडे घेऊन जातात. सम्यक संकल्पात उदात्त आणि प्रशंसनीय अशी ध्येये, महत्वाकांक्षा आणि आकांक्षा याचा समावेश होतो. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. मनामध्ये चांगले अथवा वाईट विचार येत असतात आणि म्हणून या विचारांना योग्य अशी दिशा देण्याच्या दृष्टीने सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे अंग आहे. जगामध्ये दु:ख आहे आणि या दु:खाला दूर करणे हा सम्यक संकल्पाचा मुख्य हेतू आहे. जीवनात यशस्वी होण्याकरीता जशी सम्यक दृष्टी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यशस्वी होण्याच्या मार्गाला प्राप्‍त करण्यासाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता आहे. बुध्द, धम्म आणि संघ या त्रिसरणाचे अनुसरण करणे, पंचशीलाचे पालन करणे, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिताला आपल्या जीवनात रुजविणे याकरीता सम्यक संकल्प आवश्यक आहे. श्रध्दा, वीर्य, स्मृती, समाधी व प्रज्ञा हे पाच बळ प्राप्‍त करण्याकरीता सम्यक संकल्पाची अत्यंत आवश्यकता असते. जीवनात भगवान बुध्दापासून ते भिक्‍खू-भिक्‍खूणी, उपासक-उपासीका  यांनी जे यशाचे अत्युच्च शिखर गाठले ते सम्यक संकल्पामुळेच गाठले.

३. सम्यक वाचा

            अष्टांगिक मार्गातील तिसरा मार्ग सम्यक वाचा हा आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. १) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे. २) असत्य बोलू नये. ३) माणसाने दुसर्‍याविषयी वाईट बोलू नये. ४) माणसाने दुसर्‍याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत व्हावे. ५) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरु नये ६) माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७) माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करु नये. त्यांचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे असे भगवान बुध्दांनी ‘सुत्त निपातात व दीघ निकायात’ सांगितले आहे.

            सम्यक वाचा म्हणजेच सम्यक वाणी. वाणी ही चांगल्या आणि वाईट गोष्टी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. भांडण, तंटा वादावादी हे वाईट वाणीमूळे तर प्रेम, ममता चांगल्या वाणीमूळे ऊत्पन्न होत असते. प्रबोधन, जागृती हे वाणीमूळेच शक्य आहे. म्हणून जीवन जगत असतांना वाणी हे महत्वाचे घटक आहे.

४. सम्यक कर्म

अष्टांगिक मार्गातील चवथा मार्ग सम्यक कर्मांत हा आहे. जीवनाच्या नियमांशी सुसंगत वर्तन करणे, दुसर्‍यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान  राखून प्रत्येक कृती करणे म्हणजे सम्यक कर्मांत होय.

५. सम्यक आजीविका

अष्टांगिक मार्गातील पाचवा मार्ग सम्यक आजीविका हा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले चरितार्थ चालवायचा असतो. परंतू चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. त्याच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो, ते वाईट मार्ग होत. दुसर्‍यांची हानी अथवा अन्याय न करता जगण्यापुरते मिलविण्याचे जे मार्ग ते चांगले होत. याला सम्यक आजीविका म्हणतात.

 ६. सम्यक व्यायाम

अष्टांगिक मार्गातील सहावा मार्ग सम्यक व्यायाम हा आहे. सम्यक व्यायाम म्हणजे मनाचा व्यायाम होय. सम्यक व्यायामामुळे  अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्‍न करता येतो. सम्यक व्यायामाचे चार हेतू आहेत. १) आपल्या मनात वाईट विचार येत असतील तर ते येऊ न देणे, २) आपल्या मनात वाईट विचार आले असतील तर ते काढून टाकणे, ३) आपल्या मनात चांगले विचार येत असतील तर ते येऊ देणे व ४) आपल्या मनात चांगले विचार आले असतील तर त्याचे संवर्धन करणे, वाढ करणे. अशा प्रकारे आपल्या मनाला योग्य व्यायाम देवून आपले चित्त शुध्द करता येते. चित्त शुध्दीकरीता सम्यक व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते.

७. सम्यक स्मृती

            अष्टांगिक मार्गातील सातवा मार्ग सम्यक स्मृती हा आहे. सम्यक स्मृती म्हणजे योग्य प्रकारे स्मरण करणे, मनाची जागरुकपणा व विचारीपणा होय. जीवनामध्ये जे कार्य करावयाचे आहे ते जागरुकतेने करायचे असते, हीच स्मृती आहे. सम्यक स्मृती दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवते.

८. सम्यक समाधी

      अष्टांगिक मार्गातील आठवा आणि शेवटचा मार्ग सम्यक समाधी हा आहे. भगवान बुध्द म्हणतात की, “सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प,. सम्यक वाचा,. सम्यक कर्म,. सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती प्राप्त करुन घेण्यासाठी पाच अडथळे निर्माण होतात. त्या म्हणजे- लोभ, द्वेश, आळस, संशय व अनिश्चय. हे अडथळे दूर करण्याचा मार्ग म्हणजे . सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लावते.

मनाला स्थायी व कायम स्वरुपाचे वळण सम्यक समाधीद्वारे लावता येते. चित्ताला स्थिर करण्याचे कार्य सम्यक समाधी करतो. सम्यक समाधी मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेचे काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. त्यामुळेच अकुशल कर्माकडे आकर्षित होणार्‍या मनाच्या प्रवृतीला दूर ठेवते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचा़च नेहमीच  विचार करण्याची संवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच  प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.

      या अष्टांगिक मार्गालाच मध्यम मार्ग म्हणतात. जीवनाची आत्यंतीक अशी दोन टोके आहेत. एक  सुखोभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारुन टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मुळ आहेत. हे दोन्हीही मार्ग भगवान बुध्दाने नाकारुन मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगमार्गाची शिकवण दिली.

      भगवान बुध्दांनी हा मार्ग समजावून सांगितल्यानंतर शेवटी परिव्राजकांना प्रश्‍न केला की, “जर प्रत्येकाने अष्टांगिक मार्गाचा म्हणजेच सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसर्‍या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमाणुषपणा दूर होणार नाही काय?” परिव्राजक उत्तरले, ’होय.’ म्हणून आपणही सदाचाराचे जीवन जगण्यासाठी प्रतिज्ञा करावी की, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.”               

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्माची दिक्षा देतांना बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्यात बाराव्या प्रतिज्ञेमध्ये, ‘मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचे पालन करीन.’ अशी प्रतिज्ञा आहे. तेव्हा दहा पारमिता म्हणजे काय ते आपणास माहित असणे आवश्यक आहे. तरच आपण या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो. म्हणून त्या बाबत या लेखात विवेचन केले आहे.   

स्थविरवादामध्ये पारमितेला ‘पारमि’ असे संबोधले आहे. पूर्णत्व अथवा पूर्णत: असा त्याचा अर्थ होतो. पारमिता हा पाली शब्द आहे. ‘पारम’ म्हणजे दुसरा किनारा व ‘मिता’ म्हणजे जाणे, म्हणजेच दुसर्‍या किनार्‍याला जाणे असा त्याचा अर्थ होतो. मुशल कर्माच्या सहाय्याने दुसर्‍या किनार्‍यावर जाणे म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रामधून विमुक्त होऊन निब्बाण अर्थात निर्वाण अवस्थेला पोहचणे होय.

पारमिताचा शीलमार्ग अथवा सद्‍गुणाचा मार्ग असाही अर्थ होतो. ह्या मार्गाने दु:ख दूर होण्यास मदत होते. पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री  अशा या दहा गुणांचा अंतर्भाव होतो. बोधीसत्वाला बुध्द होण्यासाठी या पारमिता पार कराव्या लागतात. तेव्हाच बोधीसत्व बुध्द होतात.

१) शील

शील म्हणजे नितिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे व चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी न करणे म्हणजे शील. शील म्हणजे पापकर्म करण्यापासून दुर राहणे. ज्यांचे बोलणे, चालणे नितीला धरुन आहे, त्याला शीलवान म्हटल्या जाते. थोडक्यात शील म्हणजे माणसाच्या मनाची स्थिती ज्यामुळे मनुष्य पापकर्म, अकुशल कर्म करण्यापासून दुर राहतो. पुण्यकर्म, कुशल कर्म संपादीत करतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘शील व सौजन्य नसेल तर शिक्षित माणूस हिस्त्र पशुपेक्षाही क्रुर व भितीप्रद असतो.’ म्हणून चारित्रहीन व्यक्ती कितीही शिकला तरीही तो पशुपेक्षाही महाभयंकर असतो. त्याच्या शिक्षणाला काहीही किंमत राहत नाही.

शील हे काचेसारखे असते. एकदा कां त्याला तडा गेला की त्याला जुडविणे कठिन जाते. तसेच शीलाचे आहे. एकदा कां कोणी शील गमावून बसले की त्याला पुन्हा ईज्जत कमाविणे कठिन होऊन बसते.

२) दान

स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्‍याच्या कल्याणासाठी स्वत:ची संपती, रक्‍त आणि देह अर्पण करणे म्हणजेच दान होय. गरजू आणि गरीब लोकांचे दु:ख नाहिसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक आहे. दानामध्ये नेत्रदान, देहदान, रक्‍तदान, शरीराच्या अवयवाचे दान याचा सुध्दा अंतर्भाव होतो.

दानाचा अर्थ म्हणजे देणे. उदारता, निर्लोभीपणा, त्याग  म्हणजेच दान होय. मनात त्यागाची भावना निर्माण होणे म्हणजेच लोभाची वृती नष्ट होणे होय.    

दान केव्हा फलदायक होते याबाबत भगवान बुध्दांनी धम्मपदात तिनशे छप्पन ते तिनशे एकोणसाठ या गाथेत सांगितले की-

तिणदोसानि खेत्तानि रागदोसा अयं पजा ।

तस्मा हि वीतरागेसु दिन्नं होति महफ्फलं ॥

याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष राग आहे, त्यामुळे वीतराग (रागरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.

तिणदोसानि खेत्तानि दोसदोसा अयं पजा ।

तस्मा हि वीतदोसेसु दिन्नं होति महफ्फलं ॥

याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष द्वेष आहे, त्यामुळे वीतद्वेष (द्वेषरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.

तिणदोसानि खेत्तानि मोहदोसा अयं पजा ।

तस्मा हि वीतमोहेसु दिन्नं होति महफ्फलं ॥

याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष मोह आहे, त्यामुळे वीतमोह  (मोहरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.

तिणदोसानि खेत्तानि इच्छादोसा अयं पजा ।

तस्मा हि वीगतिच्छेसु दिन्नं होति महफ्फलं ॥

याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष इच्छा करणे हा आहे, म्हणून इच्छा-रहित मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑक्‍टोंबर १९५६ ला दिक्षाभूमी नागपूर येथे भाषण करतांना सांगितले की, ‘तुम्ही आपल्या प्राप्‍तीचा विसावा हिस्सा समाजकार्यासाठी देण्याचा निश्चय करावा.’ सार्वजनिक लहानमोठे कामे समाजांनी दिलेल्या दानातून शक्य आहे. आपण आपल्या कमाईतला काही भाग दान देत असल्यामुळे आपला अहंकार कमी होण्यास मदत होत असते. दानातून अनेक समाजोपयोगी कामे होऊ शकतात.

 मुस्लिम समाज अडीच टक्के ‘जकात’ म्हणून दानाच्या रुपाने देत असतात. हे दान निर्धन व गोरगरिबांना करावे असा कुराणाचा आदेश आहे. अशा दानाचे निधी निर्माण करुन त्यातून समाजासाठी शैक्षणिक, आरोग्यविषयक व अन्य जनहिताचे कामे करावी. एका माहितगारानुसार एकटया मुंबई शहरांत दरवर्षी ही ‘जकात’ रक्कम रुपये दहा कोटीच्या घरात जाते. रमजान मध्ये कुराण पठण जास्तीत जास्त केले जाते. रमजान मध्ये कुराणाची विक्री खूप वाढते. एका अंदाजानुसार एकटया मुंबईत सुमारे एक कोटी रुपयाचे कुराण ग्रंथ खरेदी करुन भेट दिले जातात. ( मुजफ्‍फर हूसेन यांनी लोकसत्ता मध्ये दिनांक ०९.१२.२००१ रोजी लिहलेल्या रमजान, रोजा, इफ्‍तार या लेखावरुन)  दानातून करोडो रुपये जमा करुन त्यांनी मोठमोठे मस्जिद बांधलेले आहेत. जैन लोकं आपल्या मुलांना पैसे देऊन ते मंदिरातील दान पेटीत टाकायला सांगतात. लहानपणापासून ते आपल्या मुलांना दानाची सवय लावतात. दान पारमितामूळेच हे शक्य होत असते.

            राजा बिंबीसारने भगवान बुध्दास वेळूवन दान दिले. अनाथपिंडकाने सोन्याच्या मोहरा जमिनीवर अंथरुन ती जमीन विकत घेतली व तेथे जेतवन नावांचे विहार बांधून भगवान बुध्दास दान दिले.

      २४ नोव्हेंबर १९५६ ला सारनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “ प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावांमध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.” म्हणून धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ठिकठीकानी बुध्द विहारे बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी बुध्द विहारे बांधण्यासाठी सढळ हाताने मदत करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे.

            तसेच निवडणूकीमध्ये उमेदवाराला मत देणे म्हणजेच मताचे दान होय. पुर्वी राणीच्या पोटातून राजा निर्माण होत असे. आता मतपेटीतून राजा बनत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनूसार ‘शासनकर्ती जमात’ बनण्यासाठी मतदानाचा उपयोग करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मताला विकू नये.

      समाजाच्या विकासासाठी, अनाथाच्या कल्याणासाठी, बुध्द विहाराच्या उभारणीसाठी, बौध्द भिक्खुंच्या व्यवस्थेसाठी, बुध्द धम्म व संघाच्या उत्थानासाठी दान देउन प्रत्येकांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे.

      बाहेरील राष्टांमध्ये प्रत्येक बौध्द उपासक जीवनामध्ये कमाविलेली संपत्ती आपल्या पुढिल पिढीसाठी जमा न ठेवता ते धम्माला दान देत असतात. याउलट आपल्या देशात मात्र बौध्द उपासक जीवनामध्ये कमाविलेली संपत्ती आपल्या पुढिल पिढीसाठी जमा करुन ठेवत असतात. परंतु ते धम्माला काही लोकांचा अपवाद सोडला तर दान करीत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे बुध्द विहारे बांधता येत नाहीत किंवा अर्धवट बांधून पडलेले असतात.       तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात  की, “ प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा.”  म्हणजेच धम्माचे तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी बुध्दिवादी व शिकलेल्या लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कारण हाच वर्ग धम्म समजून घेऊन ईतरांना समजाऊन सांगू शकतात. म्हणून या वर्गाने विद्यादान म्हणजेच धम्मदानाचे कार्य करावे तेव्हाच धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. म्हणूनच धम्मदान सर्व दानामध्ये श्रेष्ट आहे असे भगवान बुध्द म्हणतात.

३) उपेक्षा

उपेक्षा म्हणजे औदासीन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्‍ती, आवड किंवा नावड नसलेली मनाची स्थिती होय. फल प्राप्तीने विचलित न होणे; परंतु सतत प्रयत्‍न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा होय. नि:स्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता आहे. वैयक्‍तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्‍नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक आहे. उपेक्षा म्हणजे उदासीनता नव्हे.

एकदा भगवान बुध्दांना विचारण्यात आले होते की, मानवाचे कल्याण कश्यात आहे? तेव्हा त्यांनी अकरा प्रकारचे कल्याण (मंगल) सांगितले आहे. त्याला महामंगल सुत्त म्हणतात. त्यापैकी अकरावे कल्याण लोकस्वभावाला धरुन सांगितले आहे. हे सुत्त उपेक्षेच्या दृष्टीने एक उदाहरण असून अत्यंत महत्वाचे आहे.

फुट्ठ्स्स लोकधम्मेही, चितं एस्सं न कंपत्ती ।

अशोकं विरजं खेमं, एतं मंगल मुत्तमं.॥

      याचा अर्थ म्हणजे लोकस्वभावासंबंधीचे लाभ आणि हानी (Gain and loss), किर्ती आणि अपकिर्ती (Fame and defame) काही ठिकाणी किर्ती आणि अपकिर्तीच्या ऎवजी यश आणि अपयश ((Success and unsuccessful)  असा उल्लेख केला आहे. स्तुती आणि निंदा (Praise and blame),   सुख आणि दु:ख  (Happiness and pain) असे जीवनात प्रसंग आल्यानंतर आपले चित्त थोडेही विचलीत होउ न देणे, शोक न करता चित्त शांत व निर्मळ ठेवणे हेच उत्तम मंगल आहे.

      लाभ आणि हानी ही लोकस्वभावाची पहिली जोडी आहे. एखादा व्यक्ती लाभ झाला की आनंदीत होतो व हानी झाली की दु:खी होतो. अशावेळी शांत राहून लोकस्वभावाच्या आहारी जाऊ नये. त्यावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.

      बुध्दाच्या वेळची एक गोष्ट आहे. एक स्त्री भन्ते सारीपुत्त आणि त्यांच्यासोबत आलेल्या भिक्खुंना भोजनदान देत असतांना तिला एक निरोप येते की, तिचा पती आणि मुलगा एका अपघातात मारल्या गेले आहेत. तरीही तिने जेवन वाढण्याचे काम न थांबविता भिक्खुंचे पुर्ण जेवण हो‍ऊ दिले. तसेच तिच्या नोकराणीकडून तूप वाढत असतांना तिच्या हातून ते भांडे खाली पडून फुटले. त्यामुळे ती दु:खी झाली होती. भन्ते सारीपुत्तानी तिची समजूत घालून सर्व फुटणार्‍या वस्तू फुटणारच… त्यामुळे वृथा शोक करु नको असे सांगितले. (All breakable things are bound to break) जेव्हा त्या स्त्रीचा पती आणि मुलगा मरन पावले आहेत. तरीही तिने जेवन वाढण्याचे काम न थांबविता भिक्खुंचे पुर्ण जेवण हो‍ऊ दिले. हे भन्ते सारीपुत्तांना कळताच त्यांनी तिच्याबाबतीत गौरवाचे उदगार काढून म्हटले की, “या धेर्यवान स्त्रीचा हा एक महान पराक्रम असून ती या स्तुतीस पात्र आहे.” (Such values on the part of courageous women is highly commendable.)

      किर्ती आणि अपकिर्ती ही लोकस्वभावाची दूसरी जोडी आहे. किर्ती होते तेव्हा आपणास आवडते. पण बदनामी मात्र आवडत नाही. आपण सतत किर्तीमान होत राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र अपकिर्ती झाली की लगेच खचून जातो. आपल्या हातून जोपर्यंत चांगले कार्य घडत असते तोपर्यंत लोक मान-सन्मान देतात. परंतू जर कां  आपल्या हातून एखादी चुक झाली की तेवढ्याच मोठ्या प्रंमाणात बदनामी करतात. अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.

      स्तुती आणि निंदा ही लोकस्वभावाची तिसरी जोडी आहे. थोड्याशा स्तुतीने आपण स्वत:ला फार मोठे समजायला लागतो आणि निंदेने मात्र हिरमुसले होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येथील सनातन्यांनी खूप निंदा केली. तरीही ते न डगमगता आपल्या हातचे कार्य सोडले नाही. बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताची घटना लिहून सादर केली तेव्हा त्यांचेवर स्तुतीसुमने उधळल्या गेलेत. त्यामुळे स्तुतीने ते वेडेपीसे झाले नाहीत. भगवान बुध्दाने सांगितलेल्या लोकस्वभावाला ध्येर्याने सामोरे जाणारे ते महापुरुष होते. शंभर टक्के कोणीही चांगले अथवा वाईट असू शकत नाही. जेथे स्तुती  आहे तेथे निंदाही असू शकते. निंदेचा प्रसंग आला असतांना सहनशिलता व संयम कायम ठेवणेच योग्य असते. निंदेमुळे मनस्थिती जर बिघडवून घेतली तर तो तेथेच थांबून जाऊ शकतो. त्यामुळे त्याचे हातून घडणारे कुटुंबाप्रती व समाजाप्रती पुढील चांगल्या कार्याला  तेथेच खिळ बसण्याची फार मोठी शक्यता निर्माण होत असते. म्हणून अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.

            सुख आणि दु:ख  ही लोकस्वभावाची चवथी जोडी आहे. आपण रोज जे कर्म करतो ते सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. इंद्रिय सुखाच्या प्राप्तीसाठी आपण नेहमी धडपडत असतो. संपत्ती, पैसा, पद, सौंदर्य, सत्ता, लग्न, कुटुंब, गाडी, बंगला इत्यादी आपल्या सुखाच्या कल्पना असतात. याची प्राप्ती झाली की जीवनात सर्व सुखे मिळालीत असे वाटते. सर्व भौतीक बाबी सुखाचे साधने आहेत. ते साध्य नाहीत.  म्हणून सर्व सुख आणि दु:खाच्या प्रसंगात आपले चित्त ढळू न देता आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. हीच भगवान बुध्दानी शिकवण महामंगल सुत्तामध्ये दिली आहे.     

४) नैष्कर्म

नैष्कर्म म्हणजे ऎहिक सुखाचा त्याग करणे होय.

राजपूत्र गौतमाने राजगृह सोडले. सर्वच ऎहीक सुखाचा त्याग करुन मानवाच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटलेत.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वतेचा उपयोग केवळ स्वत:साठी न करता समाजाच्या व देशाच्या उत्थानासाठी केला. त्यांनी ऎहिक सुखाचा त्याग करुन आयुष्याच्या शेवटपर्यंत कष्टमय जीवन जगले. यालाच नैष्कर्म म्हणतात 

५) विर्य   

विर्य म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्‍न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे विर्य होय.

आपल्यामधिल शक्तीला पुर्णपणे जागृत करणे, विरता, साहस व उत्साहपुर्वक कार्य करणे म्हणजे विर्य होय. भगवान बुध्दांनी आपल्या मनाला स्थिर ठेऊन उद्दीष्टाची पुर्तता केली. थोर व्यक्ती कितीही कष्ट पडलेत तरीही ध्येयपूर्तीसाठी पूर्ण शक्ती पणाला लाऊन यशाचे शिखर गाठतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गोलमेज परिषदेतील सहभाग, त्यातील विद्वतापुर्ण व तर्कशुध्द भाषने व अस्पृष्यांसाठी मिळविलेले राजकीय हक्क हे ‘विर्य’ या पारमिताचे उदाहरण म्हणून देता  येईल.

तसेच त्यांचेवर.घटना समितिने सोपविलेले  स्वतंत्र भारताचे संविधान लिहण्याचे महत्वाचे व अत्यंत जिकिरीचे काम प्रकृती चागली नसतांना सुध्दा २ वर्षे, ८ महिने व १३ दिवसात  लिहून पुर्ण केले. हे त्यांचे अद्वितीय स्वरुपाचे काम दुसरे उदाहरण म्हणून देता  येईल. तसे त्यांच्या जीवनात अशा प्रकारच्या कार्यकर्तृत्वाचे  अनेक घटना होवून गेल्या आहेत.

ते अठरा-अठरा तास अभ्यास करीत असत. बॅरिस्टरचा आठ वर्षाचा कोर्स त्यांनी दोन वर्षात पुर्ण केला. ते जगातील सहा विद्वानापैकी एक विद्वान म्हणून गणल्या जात होते. अमेरिकेने त्यांचा बुध्यांक काढला तेव्हा ६५ वर्षात ६५० वर्षाचे काम त्यांनी केल्याचे आढळले. ऎवढा दांडगा उत्साह त्यांच्यात होता.

६) शांती

शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेष वाढत असते. द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्‍त क्षमाशीलतेनेच शांत हो‍उ शकतो.

भगवान बुध्द म्हणतात-

नही वेरेन वेरानी सम्मन्तीध कुदाचनं।

अवेरेनच सम्मन्ति एस धम्मो सनन्ततो ॥ (धम्मपदातील पांचवी गाथा)

याचा अर्थ, वैराने वैर कधिच शमत  नाही. ते अवैरानेच शमते, हाच जगाचा सनातन नियम आहे.

तसेच धम्मपदात तिसर्‍या गाथेत म्हटले आहे की-

अक्कोच्छि मं अबधि मं अजिनि मं अहासि मे ।

ये च तं उपनय्‍हन्ति वेरं न सम्मति ॥

याचा अर्थ, ‘मला शिवी दिली;’ ‘मला मारले;’ ‘मला हरविले;’ ‘मला लुबाडले;’ जो अशा गोष्टींचा विचार करीत असतो, त्याचे वैर कधीच शमन पावत नाही.

तसेच धम्मपदात चवथ्या गाथेत म्हटले आहे की-

अक्कोच्छि मं अबधि मं अजिनि मं अहासि मे ।

ये तं न उपनय्‍हन्ति वेरं तेसूपसम्मति ॥

याचा अर्थ, ‘मला शिवी दिली;’ ‘मला मारले;’ ‘मला हरविले;’ ‘मला लुबाडले;’ जो अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्याचे वैर शमन पावते.

वैराने वैर आणखी वाढत जाते. म्हणून अशांती सोडून बंधुभाव जोडा असा आशय या गाथेचा आहे. वैरावर प्रेमानेच मात करता येते. म्हणून ‘शांती’ ही पारमिता अत्यंत महत्वाची आहे.

जगामध्ये जेव्हा युध्दसदृश्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा शांततेने वाटाघाटी करुन आपसातील भांडणे मिटवील्या जाऊ शकतात. युध्दामुळे होणारी जीवीतहानी, वित्तहानी रोखल्या जाऊ शकते.

भगवान बुध्दांनी गृहत्याग करण्यापुर्वि त्यांच्या जीवनातील एक महत्वपुर्ण घटना आहे. सिध्दार्थ गौतम शाक्य संघाचे वयाच्या २० व्या वर्षी सभासद झाले होते. ते २८ वर्षे वयाचे झाले असतांना त्यावर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या मध्ये वाहणार्‍या रोहिणी नदिच्या पाण्यावरुन मोठा संघर्ष निर्माण झाला होता. म्हणून शाक्यांच्या .सेनापतीने कोलियांशी युध्द पुकारण्याचा ठराव संघाच्या अधिवेशनात मांडला. सिध्दार्थ गौतमांनी या ठरावाला विरोध केला. त्यांनी सांगितले की, ‘युध्दाने कोणताही प्रश्‍न सूटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसर्‍या युध्दाची बीजे रोवली जातील. जो दुसर्‍याची हत्त्या करतो त्याला त्याची हत्त्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसर्‍याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्‍याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. म्हणून संघाने कोलियांच्या विरुध्द युध्दाची घोषणा करण्याची घाई करु नये, असे मला वाटते. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पांचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पांच जणांनी हे भांडण मिटवावे.’

सिध्दार्थ गौतमांनी मांडलेली सुचना त्यावेळेस मान्य करण्यात आली नव्हती. परिणामत: सिध्दार्थाला परिव्रजा घेऊन देशत्याग करावा लागला होता. मात्र त्यानंतर सिध्दार्थांनीच मांडलेल्या सुचनेनुसार शाक्यवासीय लोकांच्या चळवळीचा  दबाव येवून हा प्रश्‍न सामोपचाराने व शांततेच्या मार्गानेच लवाद नेमून नेहमीकरीता सोडविल्या गेला होता.     

७) सत्य

सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलू नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये.

सत्याशिवाय शीलाचे पालन करता येत नाही. कुशल कर्माच्या प्राप्तीसाठी सत्याचे आचरण करावे लागते. वैज्ञानीक दृष्टीकोणातून जे सिध्द करता येते ते सत्य होय.  

८) अधिष्टान

अधिष्टान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय होय. यालाच अथक प्रयत्‍न, दृढ संकल्प असेही म्हणता येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात कितीही संकटे आलीत तरीही हाती घेतलेले काम न डगमगता पार पाडले. मग तो महाड येथील चवदार तळ्याचा २० मार्च १९२० चा सत्याग्रह असो किंवा २५ डिसेंबर १९२७ चा मनुस्मृतीदहन आंदोलन असो किंवा नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा ५ वर्षे चाललेला दिर्घ सत्याग्रह असो, ते सर्व दृढ निश्चयाने पार पाडलेत.

९) करुणा

करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता होय. सर्व प्राणीमात्रावर दया करणे म्हणजेच करुणा होय.

जेथे दारिद्र्य आणि दु:ख आहे त्याकडे लक्ष देऊन ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक आहे. प्रज्ञा आणि शीलासोबत करुणेची जोड असते. म्हणून प्रज्ञा-शील-करुणा असे म्हटल्या जात असते.

देवदत्ताने घायाळ केलेल्या पक्षाला सिध्दार्थ गौतमाने वाचविले. म्हणून मारणार्‍यापेक्षा वाचविणारा अधिक श्रेष्ट असतो हे त्यांनी सिध्द केले.

एकदा एका भयानक दुर्गंधी येणार्‍या रोगाने त्रस्त झालेल्या, वयस्कर असलेल्या भिक्खुजवळ कोणी जात नसतांना भगवान बुध्दांनी त्याला आंघोळ घालून धुवून स्वच्छ केले व त्याच्यावर उपचार केले. म्हणून भगवान बुध्दांना करुणेचा महासागर म्हटल्या जाते.    

१०) मैत्री

मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे होय. तसेच  शत्रूंविषयी देखील बंधुभाव ठेवणे होय. माणसाने माणसावर प्रेम करणे आवश्यक आहे. केवळ प्रेम करणे पुरेसे नाही तर खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ माणवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणिमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा खरा अर्थ आहे. मैत्री ही केवळ माणवापुरती मर्यादित नाही. आपले मन नि:पक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. आपणा स्वत:ला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणिमात्रांना अशा मैत्रीमुळेच मिळू शकते.

भगवान बुध्दांच्या करुणा व मैत्रीमुळेच देशा-देशात, माणसा-माणसात संघर्ष निर्माण होणार नाही. जगातील युध्दाची भाषा नष्ट होत जाईल व त्यामुळे जगाचा विनाश टळेल.  आज जगाला युध्द नको तर बुध्द हवे अशीच भुमिका सर्व विचारवंत घेत आहेत.

या सर्व सद्‍गुणांच्या आचरणास प्रज्ञेची-बुध्दीची जोड दिली पाहिजे. प्रज्ञेच्या कसोटीला सद्‍गुणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुध्दीला प्रज्ञा असे म्हणता येईल. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक आहे, याचे आणखी कारण असे आहे की, दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे.

अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा दिसणार नाही. म्हणूनच प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्‍गुण आहे.

      आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने आपल्या दैनंदीन जीवनात भगवान बुध्दांनी सांगितलेल्या या दहा पारमिताचे-सद्‍गुणांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आपले जीवन निष्कलंक राहण्यास मदत होईल. परिणामत: आपण सुखी, समाधानी व आनंदीत राहू शकतो. म्हणूनच या दहा सद्‍गुणांना पारमिता म्हणतात. पारमिता म्हाणजे  पूर्णत्वाच्या अवस्था होय.

अशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व ईतरांना धम्मदिक्षा देवून मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमिवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर  आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेंच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.” 

 प्रज्ञा म्हणजे कुशल विचारांसहित आलेले पुर्ण ज्ञान की ज्यायोगे दु:ख आर्यसत्य, प्रतीत्यसमुत्पाद, आर्य अष्टांगिक मार्ग याचे यथार्थ ज्ञान होते. म्हणून सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प यांचा समावेश प्रज्ञेत केला जातो. वस्तुमात्र जसे आहेत तसे पाहणे, वस्तुमात्रांच्या वस्तुस्थिती संबंधीचा गोंधळ नष्ट करणे म्हणजेच प्रज्ञा. दु:ख नष्ट करण्यासाठी, निर्वाण प्राप्‍त करण्यासाठी किवा अर्हतपद मिळविण्यासाठी प्रज्ञा, शील व समाधी यातील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे प्रज्ञा आहे. सत्य व आर्यसत्य जाणणे, शोध घेणे, भ्रांतचित्त्त न होणे हे प्रज्ञेचे  कार्य आहे. प्रज्ञेमुळे पुढिल फयदे होतात. १) शीलाचे महत्व कळते, २) समाधीची अत्युच्च पायरी गाठता येते, ३) आर्य अष्टांगिक मार्गावर प्रगती करता येते, ४) विशुध्द जीवनाची फळे दिसू शकतात, ५) सर्व वस्तुमात्रांचे यथार्थ दर्शन होते, ६) पाखंडी मताचे यथार्थ ज्ञान होते व ७) लोभ, द्वेष व मोह याच्यापासून दुर राहता  येतात.

प्रज्ञेचे चिंतनमय, श्रुतमय व भावनामय असे तीन प्रकार आहेत. चिंतनावर आधारलेल्या प्रज्ञेला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात. जी दुसर्‍यांकडून शिकली जाते आणि जी पुस्तकी ज्ञानावर आधारलेली आहे तीला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात. सततच्या अभ्यासाने बौध्दिक विकासातून जी स्वयंस्फुर्त येते ती भावनामय प्रज्ञा.

            अष्टांगिक मार्गातील  सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे मार्ग प्रज्ञामध्ये य़ॆतात.

१) सम्यक दृष्टी

अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग सम्यक दृष्टी हा आहे. सम्यक दृष्टीचा उद्देश अविद्येचा विनाश करणे हा आहे. मनुष्याला दु:खाचे अस्तित्व आणि दु:खनिरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्य समजणे म्हणजेच सम्यक दृष्टी होय. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. कर्मकांडावर विश्वास न ठेवणे, निसर्ग नियमाविरुध्द कोणतीही गोष्ट न करणे, काल्पनिक अनुमानावर विश्वास न ठेवता वास्तवतेच्या व अनुभवाच्या सिध्दांतावर विश्वास ठेवणे इत्यादी गोष्ठी सम्यक दृष्टीमध्ये येतात. सम्यक दृष्टी आपल्या मनाला योग्य त्या दिशेने घेऊन जाते आणि आपल्या मनाला योग्य वळण लावते.

भगवान बुध्दाच्या काळात ब्राम्हण तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे बासष्ट पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राम्हण तत्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान सहा पंथ तरी प्रमूख होते. परंतू ह्या पंथाची विचारसरणी मिथ्या दृष्टीवर आधारित होती. भगवान बुध्दाला या तत्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले होते. म्हणून त्यांनी सम्यक संबोधी प्राप्‍त करुन आर्य अष्टांगिक मार्ग सर्वप्रथम पंचवर्गिय भिक्षूंना सांगितला. दु:ख, अनित्य, अनात्म व निर्वाण या मूलभूत सिध्दांतावर त्यांची विचारसरणी आधारलेली आहे. तीच सम्यक दृष्टी आहे. सम्यक दृष्टी हा प्रज्ञेचा मार्ग आहे. भगवान बुध्दाचा धम्म विज्ञानावर आधारित आहे. वास्तव आणि सत्यावर आधारित आहे. यालाच  सम्यक दृष्टी म्हणता येईल.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय राज्य घटनेत नागरिकांची काही कर्तव्य कलम ५१ (अ) मध्ये विशद केलेली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्साप्रवृती याची वाढ व जोपासना करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, अशी स्पष्ट तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच बौध्दिक विचार (Rational thinking) हे होय. ‘चिकित्सक बुध्दी वाढीस लावणे’ हा विज्ञानाचा पाया आहे. सत्यशोधन हा विज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. भगवान बुध्दांनी धम्माला पूर्णपणे विज्ञाननिष्ट बनविण्यावर भर दिला. त्यालाच त्यांनी ‘प्रज्ञा’ म्हटले आहे. प्रज्ञा हेच सम्यक दृष्टीचे तत्व असून भगवान बुध्दाच्या धम्माचे अधिष्ठान आहे.    

            भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध जोडल्या गेलेला आहे. भगवान बुध्दाने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर व आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला. वासेठ्ठ आणि भारद्वाज या ब्राम्हणाशी झालेल्या चर्चेत भगवान बुध्दाने म्हटले आहे की, खूनी, चोर, डाकू, लुटारु, व्यभिचारी, व्यसनी, फसवे असे अनेक तर्‍हेचे लोक असतात. जर ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्‍तीमान आणि सर्वव्यापी आहे तर या सर्व गोष्टिमध्ये एकतर तोच विद्यमान आहे. अथवा अशा अनिष्ट गोष्टिचा तो पुरस्कर्ता तरी आहे. असेही नसेल तर अशाप्रकारचा ईश्वर आंधळा तरी आहे. समाजात रुढ झालेल्या ईश्वरविषयक संकल्प्नेला त्यांनी विरोध केला आहे. सृष्टी ही ईश्वरनिर्मित नसून उत्क्रांत झालेली आहे असे त्यांचे ठाम मत होते. 

            दु:खाचे कारण शोधण्यासाठी भगवान बुध्दांनी वापरलेले सूत्र  म्हणजे निरिक्षण,  प्रयोग व विश्‍लेषण. हेच सूत्र  आधुनिक संशोधनासाठी वैज्ञानिक  वापरतात. म्हणजेच भगवान बुध्दाचा तर्कशुध्द, बुध्दीनिष्ट स्वतंत्र विचार आणि स्वानुभूतीप्रामाण्य आणि त्यांनी सत्य शोधण्यासाठी वापरलेले सूत्र यांच्या आधारावरच जगातील सर्व शास्त्रज्ञांनी आपले शोध लावलेले आहेत. म्हणून आपण असे म्हणू शकतो की, भगवान बुध्द हे वैज्ञानिक  विचाराचे आद्यजनकच नाहीत तर ते आधूनिक विज्ञानाचे प्रणेते सुध्दा आहेत.

            मज्झिमनिकायातील सम्मादिठ्‍ठी’ या सुत्तात सम्यक दृष्टीचे विश्‍लेषण केले आहे. अकुशल व कुशलाचे मुळ यांत सांगितले आहे. ते असे- १) प्राणी हिंसा करणे २) चोरी करणे ३) मिथ्याचार करणे ४) खोटे बोलणे ५) चुगली करणे ६) कठोर बोलणे ७) व्यर्थ बडबड करणे ८) अभिध्या करणे (लालच करणे) ९) व्यापाद करणे (प्रतिहिंसा करणे) व १०) मिथ्या दृष्टी (खोटी धारणा) बाळगणे हे अकुशल आहे. अकुशलाचे मूळ लोभ, द्वेश व मोह आहे. तथापी १) प्राणी हिंसा न करणे २) चोरी न करणे ३) मिथ्याचार न करणे ४) खोटे न बोलणे ५) चुगली न करणे ६) कठोर न बोलणे ७) व्यर्थ बडबड न करणे ८) अभिध्या न करणे (लालच न करणे) ९) व्यापाद न करणे (प्रतिहिंसा न करणे) व १०) मिथ्या दृष्टी (खोटी धारणा) न बाळगणे  हे कुशल आहे. कुशलाचे मूळ अलोभ, अद्वेश व अमोह आहे.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात एका खेडवळ ब्राम्हणाला धम्मदिक्षा देतांना एक संवाद आला आहे. ते ब्राम्हण भगवान बुध्दांना सांगतात की, ‘आम्ही निरनिराळ्या ‌ऋतूनुसार सुर्य, चंद्र, प्रजन्य आणि अग्नी यांची पुजा करतो व त्यांना होमहवन करतो. तसेच एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रम्हलोकांत त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्ममरणाच्या फेर्‍यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो.‘ तेव्हा भगवान बुध्द म्हणतात की, ‘जे थोतांडाचा अवलंब करुन असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्‍गती प्राप्त होत नाही. परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्य मानणे, ही खरी सम्यक दृष्टी होय. हिच्यामुळेच तुम्हांला सद्‍गती लाभेल.’

२) सम्यक संकल्प

अष्टांगिक मार्गातील दुसरा मार्ग सम्यक संकल्प हा आहे. जीवनातील अत्युच्च ध्येय प्राप्‍तीसाठी सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे आहे. जीवनामध्ये ध्येय प्राप्‍तीचा संकल्प मोलाचे कार्य करतो. इतर धर्मामध्ये ध्येय प्राप्‍तीसाठी ज्याला मिथ्या संकल्प म्हणता येईल  असे देवाची आराधना करण्याचा संकल्प करतात. तथापी भगवान बुध्दांनी साधकाला सम्यक संकल्पाचा जो उद्देश सांगितला तो निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे. निर्वाण हा जीवनातील अत्यंत श्रेष्ट अवस्था आहे. सार्‍या समस्‍येचे मूळ तृष्णा आहे. तृष्णेच्या मागे सारे प्राणी धावत असतात. जीवनामध्ये दु:ख उत्पन्न करणार्‍या राग, द्वेष आणि मोह यामध्ये ते गुरफटून जातात. त्यांना पराजित करण्याचे व त्यातून मुक्‍त होण्याचे कार्य केवळ सम्यक संकल्पामुळे होऊ शकते. दु:खाचे मुळ तृष्णा आहे. निर्वाण तृष्णेचा नाश करतो. तृष्णेचा नाश करण्याचे कार्य सम्यक संकल्पच करु शकते. म्हणून मिथ्या संकल्पाऎवजी भगवान बुध्द सम्यक संकल्पाकडे घेऊन जातात. सम्यक संकल्पात उदात्त आणि प्रशंसनीय अशी ध्येये, महत्वाकांक्षा आणि आकांक्षा याचा समावेश होतो. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. मनामध्ये चांगले अथवा वाईट विचार येत असतात आणि म्हणून या विचारांना योग्य अशी दिशा देण्याच्या दृष्टीने सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे अंग आहे. जगामध्ये दु:ख आहे आणि या दु:खाला दूर करणे हा सम्यक संकल्पाचा मुख्य हेतू आहे. जीवनात यशस्वी होण्याकरीता जशी सम्यक दृष्टी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यशस्वी होण्याच्या मार्गाला प्राप्‍त करण्यासाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता आहे. बुध्द, धम्म आणि संघ या त्रिसरणाचे अनुसरण करणे, पंचशीलाचे पालन करणे, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिताला आपल्या जीवनात रुजविणे याकरीता सम्यक संकल्प आवश्यक आहे. श्रध्दा, वीर्य, स्मृती, समाधी व प्रज्ञा हे पाच बळ प्राप्‍त करण्याकरीता सम्यक संकल्पाची अत्यंत आवश्यकता असते. जीवनात भगवान बुध्दापासून ते भिक्‍खू-भिक्‍खूणी, उपासक-उपासीका  यांनी जे यशाचे अत्युच्च शिखर गाठले ते सम्यक संकल्पामुळेच गाठले.

शील

शील म्हणजे विशुध्दीमार्ग. या विशुधीमार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत, ज्याला पंचशील म्हणतात. १) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, २) चोरी न करणे, ३) व्यभिचार न करणे, ४) खोटे न बोलणे व ५) मादक पदार्थाचे सेवन न करणे.

पंचशीलाबाबत एक गोष्ट अशी आहे की, एकदा एक भिक्खु एका गांवावरुन दुसर्‍या गांवला जात असतांना रात्र होते. म्हणूने ते त्या गांवच्या शेवटच्या घरातील गृहस्थाला निवार्‍याची व्यवस्था करायाला विनंती करतात. तेव्हा तो गृहस्थ आनंदीत होऊन भिक्खुंची राहण्याची व्यवस्था करतात. सकाळी उठून भिक्खु त्या गृहस्थाला पंचशीलाचे पालन केल्यामूळे तुझे कल्याण होईल असे सांगतात. परंतू त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा असल्यामूळे तो मनातल्या मनात विचार करतो की, हे शील पाळणे मला शक्य होणार नाही. म्हणून जस-जसे भिक्खु एक-एक शील समजाउन सांगतात तस-तसे तो गृहस्थ शीलाचे पालन करण्यास नकार देतो. त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा आहे हे सुध्दा तो गृहस्थ भिक्खूला सांगू शकत नाही. म्हणून भिक्खु म्हणतात की, पांचही शीले पाळता येत नसतील तर निदान चार शीले तरी पाळा. तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की, निदान तीन शीले तरी पाळा. तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की, निदान दोन शीले तरी पाळा. तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की, निदान एक शील तरी पाळा. गृहस्थाला वाटते की, एखादा शील तरी पाळायला काय हरकत आहे, म्हणून तो गृहस्थ भिक्खूला म्हणतो, “मी खोटे बोलणार नाही, हे शील पाळायला तयार आहे.” भिक्खु उपदेश करुन निघून जातात.            रात्रीला नेहमीप्रमाणे तो गृहस्थ चोरी करायला बाहेर पडतो. त्याचवेळेस त्या राज्याचा राजा सुध्दा वेशांतर करुन राजवाडयाच्या बाहेर येतो. तेव्हा त्या राज्याला तो गृहस्थ दिसतो. त्या गृहस्थाला राजा विचारतो, “कोण आहेस ? काय करतो ?” त्या गृहस्थाने खरे बोलण्याची प्रतिज्ञा घेतल्यामूळे त्याने सांगितले, “मी चोर आहे. राजाच्या तिजोरितील हिरे मला चोरायचे आहे.” तेव्हा त्या राजाला त्या़च्या खरे बोलण्याबद्दल कौतूक वाटले. राजाने त्याला सांगितले, “ तू तर खरा बोललास. मी जर हे राजाला सांगितले तर ते तुला शिक्षा करतील. म्हणून तू जे हिरे चोरशील त्यापैकी मला अर्धे दे. म्हणजे मी राजाला सांगणार नाही.” या गोष्टीला तो चोर तयार झाला. तो राजवाडयाच्या आंत जाऊन हिर्‍याचा शोध घेतो. तेव्हा त्याला असे दिसले की, त्या तिजोरीत फक्‍त तिनच हिरे आहेत. यापैकी अर्धे हिरे बाहेरच्या व्यक्‍तीला कसे देणार असा प्रश्‍न पडल्यामूळे तो एक हिरा तसाच ठेऊन दोन हिरे सोबत घेऊन राजवाडयाबाहेर पडतो. बाहेरच्या व्यक्‍तीला त्या दोन पैकी एक हिरा देतो. त्या  व्यक्‍तीने विचारल्यामूळे पत्ता सांगून  तो चोर निघून जातो.

दुसर्‍या दिवशी राजा प्रधानाला तिजोरीची पाहणी करायला सांगतात. तिजोरी पाहील्यानंतर प्रधानाला तिन पैकी फक्‍त दोन हिरे चोरीला गेल्याचे आढळते. प्रधानाला वाटते की, चोराने तिन्हिही हिरे चोरले असते. राजाला कुठे माहिती आहे की, एक हिरा चोराने तेथेच ठेऊन दोन हिरे घेऊन गेला. म्हणून तो एक हिरा स्वत:जवळ ठेवतो व राजाला सांगतो की, तिजोरितील तिन्हिही हिरे चोरीला गेले आहेत. राजाला त्या प्रधानाचा खोटेपणा व चोराचा खरेपणा लक्षात आला. त्याचवेळेस  राजा दरबार भरवतो. हिरे चोरणार्‍या त्या चोराला राजा दरबारात बोलावीतो. चोराच्या लक्षात येते की, रात्रीचा जो व्यक्‍ती होता तो राजा आहे. आपण त्याला खरे सांगितल्यामूळे राजा आता आपल्याला निश्चितच शिक्षा करणार! आपण भिक्खुमूळे फसल्या गेलो याचे त्याला दु:ख झाले. राजाने प्रधानाने केलेल्या खोटेपणा बद्दल प्रधानाला काढून टाकले व चोराच्या खर्‍यापणाबद्दल त्या चोराला प्रधान बनवीले. राजाचा हा निर्णय पाहून चोराला आश्चर्य वाटले. भिक्खूने सांगितलेल्या एका शीलाचे पालन केल्यामूळे मला प्रधानपद मिळते. मी जर पांचही शीलाचे पालन केले असते तर मी कुठल्या कुठे जाऊन पोहचलो असतो. एवढी ताकद या पंचशीला मध्ये आहे याची त्याला जानिव झाली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, भगवान बुध्द म्हणतात, “प्रत्येक माणसाने शीलाची ही पांच तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मुल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच पांच तत्वे किवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. जगात पतितांचे दोन वर्ग असतात. ज्यांच्यासमोर काही आदर्श आहेत असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही. त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. याउलट ज्यांच्यासमोर एखादा आदर्श आहे, असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्‍न करित असतो. कारण त्याला आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते. जीवनाचा आदर्श म्हणून हीच तत्वे आदर्श आहेत. ही तत्वे व्यक्‍तीच्या हितासाठी आणि सामाजिक हित साधणारी आहेत.”

शील म्हणजे नितिमत्ता. जो नितिवान आहे, जो नितिने चालतो, बोलतो, वागतो त्याला आपण शीलवान म्हणतो. शील म्हणजे मानसाच्या मनाची अशी घडण की ज्यामुळे मनुष्य पापकर्मापासुन, अकुशल कर्मापासुन दुर राहतो. तो कुशल कर्म करतो.

भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेत्र्यांशीव्या गाथेत म्हणतात,

“सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा !

सचीत्त परियोदपनं, एतं बुध्दांन सासनं !!

याचा अर्थ, कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, वाईट चित्ताला परिशुध्द ठेवणे, हीच बुध्दाची शिकवण आहे.

अकुशल कर्म

अकुशल कर्म तीन प्रकाराचे आहेत. १) कायिक, २) वाचिक व ३) मानसिक

कायिक अकुशल कर्मात पुढिल प्रमाणे तीन कर्मे येतात. १) हिंसा करणे, २) चोरी करणे व ३) व्यभिचार करणे.

वाचिक अकुशल कर्मात पुढिल प्रमाणे चार कर्मे येतात. १) खोटे बोलणे, २) चुगली-चहाडी करणे, दुसर्‍याची निंदा करणे  ३) शिव्या देणे, कटू बोलणे व ४) व्यर्थ, बाष्कळ बडबड करणे.         मानसिक अकुशल कर्मात पुढिल प्रमाणे तीन कर्मे येतात. १) लोभ करणे, २) द्वेष करणे व ३) मोह, मिथ्या दृष्टी बाळगणे. अशा प्रकारे दहा अकुशल कर्मे आहेत.

तसेच कुशल कर्म तीन प्रकाराचे आहेत. १) कायिक, २) वाचिक व ३) मानसिक

कायिक कुशल कर्मात पुढिल प्रमाणे तीन कर्मे येतात. १) अहिंसा म्हणजे मैत्री व करुणा, २) अचोरी म्हणजे दान करणे व ३) अव्यभिचार म्हणजे संतुष्ट राहणे

वाचिक कुशल कर्मात पुढिल प्रमाणे चार कर्मे येतात. १) सत्य बोलणे, २) चुगली-चहाडी न करणे, दुसर्‍याची निंदा न करणे  ३) शिव्या न देणे, कटू न बोलणे, प्रिय बोलणे  व ४) व्यर्थ, बाष्कळ बडबड न करणे, यथायोग्य बोलणे

मानसिक कुशल कर्मात पुढिल प्रमाणे तीन कर्मे येतात. १) अलोभ करणे, २) अद्वेष करणे व ३) अमोह असणे, मिथ्या दृष्टी न बाळगणे. अशा प्रकारे दहा कुशल कर्मे आहेत.

कर्म कोणत्या हेतूने केले, त्यावर ते कर्म कुशल आहे की अकुशल आहे ते अवलंबून आहे. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करीत असतांना एखादा रोगी मरण पावला तर त्याला अकुशल कर्म म्हटल्या जाणार नाही. परंतु एखाद्यांनी जर कुणाच्या पोटात सुरा खुपसून त्याला मारले असेल तर ते अकुशल कर्म होईल.

निंदा न करणे, नेहमी जागृत राहणे, रात्रंदिवस मनाला नियंत्रणात ठेवणे, निर्वाणासाठी नेहमी प्रयत्‍नशील राहणे, वाणीचा संयम बाळगणे ईत्यादी कुशल कर्मे धम्मपदात सांगितले आहे.

कुशल कर्माबाबत भगवान बुध्द धम्मपदाच्या त्रेपन्नाव्या गाथेत म्हणतात-

यथापि पुप्फरासिम्हा कबिरा मालागुणे बहूं।

एवं जातेन मच्चेन कत्तब्बं कुसलं बहुं ॥

याचा अर्थ, ज्याप्रामाणे कोणी पुष्पराशीतून माळांचे सर (हार) करावेत, त्याप्रमाणे जगात जन्माला आलेल्या प्राण्यांनी अनेक कुशल कर्मे करावीत.

तसेच धम्मपदात पन्नासाव्या गाथेत सांगितले आहे की-

न परेसं विलोमानि न परेसं कताकतं।

अत्तनो’च अवेक्खेय्य कतानि अकतानि च ॥

याचा अर्थ, ना दुसर्‍याच्या दोषाला, ना दुसर्‍याच्या कृत-अकृत्याला बघावे (माणसाने फक्त) आपल्याच कृत-अकृत्याला बघावे.

अष्टांगिक मार्गातील सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे मार्ग शीलामध्ये येतात.

१) सम्यक वाचा

अष्टांगिक मार्गातील तिसरा मार्ग सम्यक वाचा हा आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. १) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे. २) असत्य बोलू नये. ३) माणसाने दुसर्‍याविषयी वाईट बोलू नये. ४) माणसाने दुसर्‍याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत व्हावे. ५) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरु नये ६) माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७) माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करु नये. त्यांचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे असे भगवान बुध्दांनी ‘सुत्त निपातात व दीघ निकायात’ सांगितले आहे.

सम्यक वाचा म्हणजेच सम्यक वाणी. वाणी ही चांगल्या आणि वाईट गोष्टी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. भांडण, तंटा वादावादी हे वाईट वाणीमूळे तर प्रेम, ममता चांगल्या वाणीमूळे ऊत्पन्न होत असते. प्रबोधन, जागृती हे वाणीमूळेच शक्य आहे. म्हणून जीवन जगत असतांना वाणी हे महत्वाचे घटक आहे.

‘धम्मपदात’ वाणीचे महत्व सांगितले आहे. मन हे सर्व धर्माचे पूर्वगामी अग्रणी आहे. मन हे श्रेष्ठमय आहे, मनोमय आहे. जो कोणी दुष्ट मनाने बोलतो किवा कर्म करतो त्याच्या मागे गाडी ओढणार्‍या बैलाच्या पायाच्या मागे ज्याप्रमाणे गाडीचे चाके जातात, त्याचप्रमाणे दु:ख जाते. त्याचप्रमाणे जो कोणी प्रसन्न मनाने बोलतो किवा कर्म करतो, त्याच्यामागे सुख हे कधीही साथ न सोडणार्‍या छायेप्रमाणे मागे मागे जाते. कोणालाही कठोर बोलू नये, रागावू नये. असे बोलण्याने दुसरेही तुम्हाला तसेच बोलतील. नेहमी सत्य बोलावे. कोणावरही क्रोधीत होऊ नये. वाणी संयत ठेवावी. वाणीचे वाईट आचरण त्यागून वाचेने चांगले आचरण करावे. कोणासोबत उध्दट्पणे बोलू नये. स्वत:ची आत्मस्‍तुती करु नये. दुसर्‍यांचा तिरस्कार करु नये. कुणालाही शिव्याश्याप देऊ नये. ईतरांना त्रास होणार नाही अशी वाणीने कृती करावी. मनाला आवडणारी, हृदयाला भिडणारे व कानाला मधुर वाटणारी वाणी बोलावे.  अशी शिकवण भगवान बुध्दांनी दिली आहे.

कठोर वाणीचे, मिथ्या वाणीचे जे वाईट परिणाम आहेत, ते भगवान बुध्दांनी ‘अंगुत्तरनिकायात’ सांगितले, “काही काही व्यक्‍ती क्रोधी स्वभावाचे, अशांत चित्ताचे, थोडेही बोलले तर रागावणारे, चिडचिडे, कठोर हृदय होऊन विरोधी होतात. क्रोध, द्वेष आणि असंतोष प्रगट करतात. ज्याप्रमाणे जुन्या व्रणावर जर लाकूड किंवा काही लागले तर रक्‍त वाहू लागते, त्याचप्रमाणे काही व्यक्‍ती क्रोधी, अशांत चित्ताचे रागावणारे, चिडचिडे व क्रोध, द्वेष आणि असंतोष प्रगट करणारे असतात. अशाप्रकारच्या व्यक्‍ती उपेक्षा करण्यायोग्य असतात. त्यांचे अनुकरण करु नये. सेवा करु नये. आदर करु नये. कारण अशी व्यक्‍ती माझा अपमान करु शकते. अपशब्द म्हणू शकते. मला अनर्थ व हानी पोहचवू शकते. म्हणून अशा प्रकारच्या व्यक्‍तीच्या प्रती उपेक्षा करावी.त्याचे अनुसरुन व आदर करु नये.”  भगवान बुध्द भिक्षूंना म्हणाले, “भिक्षूंनो, जर कोणी माझी (बुध्दाची), धम्माची व संघाची निंदा करतील तेव्हा तुम्ही त्यांचेशी वैर, असंतोष आणि आपल्या मनात राग धरु नये. कुपित किंवा खिन्न होऊ नये. त्यामुळे तुमचीच हानी होईल. राग अथवा खिन्न झाल्यामुळे ती गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे ते कळणार नाही. म्हणून सत्य किंवा असत्याला शोधले पाहिजे.

तसेच कोणी प्रशंसा करीत असेल तर तेव्हादेखील आनंदीत, प्रसन्न अथवा हर्षोत्‍साहित होऊ नका. त्यामध्ये सुध्दा तुमचीच हानी आहे.” व्यक्‍तीचे व्यक्‍तिमत्व हे त्याच्या वाणीवरुन, बोलण्यावरुन कळून येते. बोलणारी व्यक्‍ती आपल्या चांगल्या अथवा वाईट बोलाण्याने दुसर्‍याशी चागले अथवा वाईट संबंध प्रस्थापित होतात. बुध्दांच्या वचनात व्यर्थ बडबड राहत नव्हती. ते असंयत गोष्टी मानत नव्हते. वचनाने त्यांनी अहित गोष्टी दूर सारल्यात आणि बहुजनांच्याच हिताच्या गोष्टी सांगितल्या.  म्हणून ‘सम्यक वाचा’ हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. तो जीवनात उतरविण्याचा प्रत्येकांनी प्रयत्‍न करायला पाहिजे.

२) सम्यक कर्मांत

अष्टांगिक मार्गातील चवथा मार्ग सम्यक कर्मांत हा आहे. जीवनाच्या नियमांशी सुसंगत वर्तन करणे, दुसर्‍यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान  राखून प्रत्येक कृती करणे म्हणजे सम्यक कर्मांत होय.

‘सुत्तनिपातात’ भगवान बुध्दांनी सांगितले आहे की, ‘कर्माने जग चालते. प्राणी कर्माने जगतात. चालण्याकरीता रथ ज्याप्रमाणे अणीवर अवलंबून असतो तसे प्राणी कर्मबंधनावर अवलंबून असतात.’ याचा अर्थ संसाराचा नियंत्रक कोणी ईश्वर नसून व्यक्‍तीचे कर्म आहे.’

वैदिक ब्राम्हणी धर्म किंवा अन्य धर्म मनुष्याला यशाची प्राप्‍ती करण्यासाठी ईश्वराचा व परमात्मा यांचा वाटा असतो असे सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दांने असे काही न सांगता जे काही यश प्राप्‍त होते ते व्यक्‍तीच्या कर्माने होत असते. कर्माला महत्वाचे स्थान आहे. चांगले किंवा वाईट हे जे परिणाम आहेत ते व्यक्‍तीच्या कर्मावर अवलंबून असते.

माणसाच्या हातून चांगले अथवा वाईट कर्म घडत असते त्याचे मुळ मनाच्या चेतनेमध्ये असते. म्हणजेच त्याचे चित्त अथवा मन हे केंद्रवर्ती असते आणि म्हणून सम्यक कर्मांताकरिता मनाला संयमित करणे महत्वाचे आहे. मानवी मन चंचल, चपळ, अनियंत्रित असते. ज्याप्रमाणे बाणाला सरळ करतो त्याप्रमाणे मेघावी (बुध्दीमान) पुरुष आपल्या चित्ताला सरळ करतो. एक शत्रू आपल्या शत्रूचे आणि एक वैरी आपल्या वैर्‍याचे जितके नुकसान करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान वाईट मार्गावर लागलेले चित्त करीत असते. आई-वडील, नातेवाईक जेवढे चांगले करु शकत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदा चांगल्या मार्गावर लागलेले चित्त करीत असते. म्हणुन सम्यक कर्म करण्यासाठी चित्त सुध्दा सम्यक असायला पाहिजे. म्हणजेच सम्यक कर्मांतचे मुळ हे चित्तच आहे. धम्मपदातील बालवग्गोमध्ये मुर्खाबरोबर संगती करण्याचे दुष्परिणाम आणि चांगल्या बरोबर मैत्रीचे सुपरिणाम माणसाला भोगावे लागतात असे सांगितले आहे. म्हणून जगामध्ये वावरत असतांना जर स्वत:पेक्षा चांगले अथवा स्वत:सारखे सोबती मिळाले नाही तर दृढतेने एकट्यानेच विचरण करावे. परंतू मुर्खाशी संगत करु नये.

जसे बी पेराल तसे उगवेल असे कर्माचा सिध्दांत आहे. म्हणून व्यक्‍तीच्या मनामध्ये सदाचरणाचे, नितिमत्तेचे बीज पेरणे आवश्यक आहे तेव्हाच त्याचेकडून चांगले आचरण घडू शकेल.

धम्मपदाच्या एकोणसत्तराव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

मधुवा मञ्ञति बालो याव पापं न पच्चति।

यदा च पच्चति पापं अथ बालो दुक्खं निगच्छति ॥

याचा अर्थ, जोपर्यंत पाप कर्म फळ देत नाही तोपर्यंत मुर्ख मनुष्य त्याला मधासारखे (गोड) मानतो. परंतु जेव्हा पाप कर्म फळ देते तेव्हा त्यास दु:ख होते. म्हणजेच वाईट वागणार्‍याला जोपर्यंत वाईट वागणुकीचे फळ मिळत नाही तोपर्यंत तो तसाच वागत असतो. परंतू जेव्हा त्याला फळ मिळते तेव्हा त्याच्यावर पश्चाताप करण्याची पाळी येते.

म्हणून धम्मपदाच्या सदुसष्टाव्या गाथेमध्ये वाईट कर्माचे काय परिनाम होतात ते सांगितले –

न तं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पति ।

यस्स अस्सुमुखो रोदं विपाकं पटिसेवति ॥

याचा अर्थ, ते कर्म करणे चांगले नव्हे की जे करुन पश्चाताप होईल, आणि ज्याचा परिणाम रडत रडत भोगावा लागेल.

तसेच धम्मपदाच्या अडुसष्टाव्या गाथेमध्ये चांगल्या कर्माचे काय परिनाम होतात ते सांगितले –

तञ्च कम्मं कतं साधु यं कत्वा नानुतप्पति ।

यस्स पतीतो सुमनो विपाकं पटिवेवती ॥

याचा अर्थ, ते कर्म करणे चांगले आहे, जे करुन (करणार्‍याला) पश्चाताप होत नाही, आणि ज्याचा परिणाम प्रसन्न मनाने  भोगावा लागतो.

मनुष्य जीवनात जे काही बरे-वाईट कर्म करेल त्याला तोच जबाबदार असतो. म्हणून ज्यांनी जीवनात शरीर, वाणी व मनाने वाईट कर्म केले असेल तर त्यांनी यापुढे तरी चांगले कर्म करावे म्हणजे त्याचे दुष्कर्म हळूहळू दुर्बल होत जाईल असे भगवान बुध्द अंगुत्तर निकायात म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे भगवान बुध्दांच्या उपदेशानूसार डाकू अंगुलीमाल यांनी वाईट कर्म सोडून  भिक्खु झालेत व पुढे कुशल कर्म करुन अहर्तपदाला पोहचलेत.

म्हणून धम्मपदाच्या एकशेसत्तराव्या गाथेमध्ये पाप पुन:पुन्हा करु नये. असे भगवान बुध्द म्हणतात –

पापंञ्चे पुरिसो कयिरा न तं  कयिरा पुनप्पुनं ।

न तम्हि छ्न्दं कयिराथ दुक्खो पापस्स उच्चयो ॥

याचा अर्थ, जर पाप केले तर ते पुन:पुन्हा करु नये. त्यामध्ये रममान होऊ नये. पापाचा संचय दु:खास कारणीभूत होतो.

तसेच धम्मपदाच्या एकशेसत्तराव्या गाथेमध्ये शुभ कर्मे पुन:पुन्हा करावे असे भगवान बुध्द म्हणतात –

पुञ्ञञ्चे पुरिसो कयिरा  कयिराथेनं पुनप्पुनं ।

तम्हि छ्न्दं कयिराथ सुखो पुञ्ञस्स उच्चयो ॥

याचा अर्थ, जर शुभ कर्मे केले तर ते पुन:पुन्हा करावे. त्यामध्ये रममान व्हावे. पुण्याचा संचय सुखास कारणीभूत होतो.

ब्राम्हणी धर्मात जन्मामुळे श्रेष्टत्व आणि कनिष्टत्व प्राप्‍त होते असे सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दांने कर्मावर श्रेष्टत्व आणि कनिष्टत्व प्राप्‍त होते असे सांगितले आहे. मनुष्यमात्रामध्ये जे दु:ख उद्‍भवते ते निर्माण होण्याचे कारण कर्मच आहे. दारुडा व्यक्‍ती दारुच्या आहारी जाऊन स्वत:च्या शरिराची, संसाराची नासाडी करीत असतो.

३) सम्यक आजीविका

अष्टांगिक मार्गातील पाचवा मार्ग सम्यक आजीविका हा आहे

“सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा !

सचीत्त परियोदपनं, एतं बुध्दांन सासनं !!

याचा अर्थ, कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, वाईट चित्ताला परिशुध्द ठेवणे, हीच भगवान बुध्दाची शिकवण आहे.

धम्मपदातील या गाथेनुसार आचरण करणे हीच सम्यक आजीविका आहे

प्रत्येक व्यक्‍तीला आपला चरितार्थ चालवावयाचा असतो. परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहत. काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसर्‍यांची हानी किंवा त्यांचेवर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग ते चांगले होत. यालाच सम्यक आजीविका म्हणतात.

समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. ज्याने सम्यक समाधी प्राप्‍त केली आहे तो ‘वस्तुमात्र जसे आहेत तसे’ पाहू शकतो. गोष्टी जसे आहेत तसे पाहणे याला बुध्द धम्मात फार महत्व आहे. गोष्टी जसे आहेत तसे सत्यस्वरुपात पाहिल्यानेच दु:ख, अनित्यता व अनात्मता ह्या तीन भगवान बुध्दाच्या महत्वाच्या सिध्दांताविषयीचा अनुभव येतो. हा अनुभव आणि ज्ञान होत असल्यानेच त्याला आपोआपच प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांताप्रमाणे दु:ख नष्ट होते.

माणसाचे  मन स्थिर नसते. ते सहा इन्द्रियविषयांत नेहमी रममाण झालेले असते. ‘वस्तुमात्र जसे आहेत तसे’ पाहण्यासाठी मन केंद्रित करावे लागते. अकुशल मनोवृतीचा पूर्ण निरोध करुन कुशल मनोवृतीचा विकास करणे ही बुध्द धम्माची शिकवण आहे. सम्यक समाधी साधण्यासाठी शील संपादन केले पाहिजे. शीलाशिवाय समाधीचा लाभ होत नाही.

अष्टांगिक मार्गातील सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे मार्ग समाधीमध्ये येतात.

१) सम्यक व्यायाम

अष्टांगिक मार्गातील सहावा मार्ग सम्यक व्यायाम हा आहे. सम्यक व्यायाम म्हणजे मनाचा व्यायाम होय. सम्यक व्यायामामुळे  अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्‍न करता येतो. सम्यक व्यायामाचे चार हेतू आहेत. १) आपल्या मनात वाईट विचार येत असतील तर ते येऊ न देणे, २) आपल्या मनात वाईट विचार आले असतील तर ते काढून टाकणे, ३) आपल्या मनात चांगले विचार येत असतील तर ते येऊ देणे व ४) आपल्या मनात चांगले विचार आले असतील तर त्याचे संवर्धन करणे, वाढ करणे. अशा प्रकारे आपल्या मनाला योग्य व्यायाम देवून आपले चित्त शुध्द करता येते. चित्त शुध्दीकरीता सम्यक व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते.

अंगुत्तर निकायात चार प्रकाराचे प्रयत्‍न सांगितले आहेत. पहिला प्रयत्‍न म्हणजे, उत्पन्न न झालेले अकुशल कर्माची उत्‍पती होऊ न देण्याचा संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. दूसरा प्रयत्‍न म्हणजे, उत्पन्न झालेले अकुशल कर्माचा समुळ नाश करण्याचा संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. तिसरा प्रयत्‍न म्हणजे, उत्पन्न न झालेले कुशल कर्म उत्पन्न होण्याकरीता संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. पहिला प्रयत्‍न म्हणजे, उत्पन्न झालेले कुशल कर्माच्या अवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी, वृध्दी करण्यासाठी व विपुलतेकरीता  संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. यालाच सम्यक व्यायाम म्हटले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, मनाच्या बाबतीत भगवान बुध्दाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्टय असे की, सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे. मन हे सर्व वस्तूच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूवर अंमल चालविते. त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन हे सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्‍तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्‍तीचेच बनले असते.

भगवान बुध्दाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्टय असे की, आपल्यामध्ये निर्माण होणार्‍या आणि आपल्यावर बाहेरुन ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बर्‍या-वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे, ते ते मनातूनच उत्‍पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे, ते ते मनातूनच उत्‍पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणार्‍या बैलांच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात. त्याचप्रमाणे अशुध्द चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दु:ख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धम्माचे सार आहे.

धम्मपदाच्या ‘यमकवग्गो’च्या पहिल्या गाथेमध्ये लिहिले आहे की-

मनोपुब्ब‍ग्‍ङ‍मा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।

मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा ।

ततो’नं दुक्ख्मन्वेति चक्कं’ पदं ॥

याचा अर्थ म्हणजे सर्व धर्म (अवस्था) प्रथम मनात उत्पन्न होत असतात. मनच मुख्य आहे, ते (धर्म) मनोमय आहेत. जेव्हा मनुष्य मलिन मनाने बोलतो वा कार्य करतो, तेव्हा (बैलगाडीचे) चाक जसे बैलाच्या मागेमागे लागते तसेच दु:ख त्याच्या मागे लागते.

दुसर्‍या गाथेमध्ये लिहिले आहे की-

मनोपुब्ब‍ग्‍ङ‍मा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।

मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा ।

ततो’नं सुखमन्वेति छाया’व अनापयिनी ॥

याचा अर्थ म्हणजे सर्व धर्म (अवस्था) प्रथम मनात उत्पन्न होत असतात. मनच मुख्य आहे, ते (धर्म) मनोमय आहेत. जेव्हा मनुष्य स्वच्छ मनाने बोलतो वा कार्य करतो, तेव्हा मनुष्याचा कधी साथ न सोडणार्‍या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागोमाग फिरते.

भगवान बुध्दाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्टय असे की, मनुष्याने पापकृत्य टाळावे.

त्यांच्या शिकवणीचे चवथे वैशिष्टय असे की, खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून तो धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. म्हणून मनावर चांगले संस्कार करण्यासाठी सम्यक व्यायामाची गरज आहे.

मनामध्ये चांगल्या आणि वाईट विचाराचे नेहमीच द्वंद सुरु असते. कुशल आणि अकुशल असे दोन्हिही विचार मनामध्ये उत्‍पन्न होत असतात. अकुशल विचाराला मनात उत्‍पन्न होऊ न देणे, कुशल विचाराची वाढ करणे आणि वाईट चित्ताला नष्ट करण्य़ाचा प्रयत्‍न करणे, कोणतेही वाईट कर्माकडे मनाला न वळविणे, हे मुख्य कार्य सम्यक व्यायामाचे आहे. समाधीची ही पहिली अवस्था आहे. म्हणून सम्यक व्यायाम हे अत्यंत महत्वाचे आहे. जसा बाण बनविणारा बाणाला सरळ करतो. त्याचप्रमाणे वाईट मार्गाला लागलेल्या चित्ताला कुशलतेकडे आणण्याचे महत्वाचे कार्य सम्यक व्यायामाचे आहे.

धम्मपदाच्या तेराव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

यथागारं दुच्छन्नं वुट्ठी समतिविज्झति ।

एवं अमावितं चित्तं रागो समतिविज्झति ।।

याचा अर्थ, योग्य प्रकारे न साकारलेल्या घरांत ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरते, त्याचप्रमाणे असंस्कारीत चित्तामध्ये राग, लोभ आदी मनोविकार शिरतात.

तसेच धम्मपदाच्या चवदाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

यथागारं सुच्छन्नं वुट्ठी समतिविज्झति ।

एवं अमावितं चित्तं रागो समतिविज्झति ।।

याचा अर्थ,  योग्य प्रकारे साकारलेल्या घरांत ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरत नाही, त्याचप्रमाणे सुसंस्कारीत चित्तामध्ये राग, लोभ आदी मनोविकार शिरत नाहीत. याकरिता मनाला संस्कारीत करण्यासाठी सम्यक व्यायामाची नितांत आवश्यकता आहे.

धम्मपदाच्या बेचाळीसव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

दिसो दिसं यन्तं कयिरा वेरी वा पन वेरिनं ।

मिच्छापणिहिंतं चित्तं पापियो’नं ततो करे ॥

याचा अर्थ, शत्रू-शत्रूचे किंवा वैरी वैर्‍याचे जेवढे नुकसान करते, त्यापेक्षा वाईट मार्गाने गेलेले चित्त मनुष्याचे जास्त नुकसान करते.

तसेच धम्मपदाच्या त्रेचाळीसव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

न तं माता पिता कयिरा अञ्‍ञे वापि च ञातका ।

सम्मापणिहितं चित्तं सेय्यसो’नं ततो करे ॥

याचा अर्थ, आई-बाप किंवा दुसरे नातेवाईक, जेवढे कल्याण करु शकत नाही, त्यापेक्षा जास्त कल्याण सन्मार्गावर असलेले चित्त करु शकते. याकरिता चित्ताला सन्मार्गावर आणण्याचे काम सम्यक व्यायाम करते.

धम्मपदाच्या तेहतीसाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

फन्दनं चपलं चित्तं दुरक्खं दुन्निवारयं ।

उजुं करोति मेघावी उसुकारो’व्तेजनं ॥

याचा अर्थ, चित्त चंचल आहे, चपळ आहे, रक्षण करण्यास व निवारण करण्यास कठीण आहे. अशा चित्ताला मेघावी (बुध्दीमान) पुरुष सरळ करतो, जसा बाणकार बाणाला सरळ करतो. म्हणून चंचल चित्ताला सरळ करण्याचे काम सम्यक व्यायाम करते.

धम्मपदाच्या अडतीसाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

अनवट्ठितचित्तस्स सध्दम्मं अविजानतो ।

परिप्लवपसादस्स पञ्ञा न परिपूरति ॥

याचा अर्थ, ज्याचे चित्त स्थिर नाही, जो सध्दर्म जाणत नाही, ज्याचे चित्त प्रसन्न नाही, असा पुरुष प्रज्ञावान होऊ शकत नाही. म्हणून प्रज्ञावान होण्यासाठी सम्यक व्यायामाची गरज आहे.

२) सम्यक स्मृती

अष्टांगिक मार्गातील सातवा मार्ग सम्यक स्मृती हा आहे. सम्यक स्मृती म्हणजे योग्य प्रकारे स्मरण करणे, मनाची जागरुकपणा व विचारीपणा होय. जीवनामध्ये जे कार्य करावयाचे आहे ते जागरुकतेने करायचे असते, हीच स्मृती आहे. सम्यक स्मृती दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवते.

भगवान बुध्दांनी कामतृष्णेपासून आणि त्याच्या दुष्परिणामापासून दूर राहाण्यासाठी सम्यक स्मृतीचे महत्व सांगितले आहे. मनुष्याने सदा स्मृतीमान राहून कामतृष्णेचा त्याग करावा.

संयुक्‍त निकायात सांगितले आहे की, स्मृतिमान व्यक्‍तीचे सदा कल्याण होत असते. स्मृतीमान व्यक्‍ती सुखाच्या आधीन राहतो. असा व्यक्‍ती श्रेष्ट जीवन जगत असतो. जो स्मृतीमान असतो तो वैरापासून मुक्‍त असतो. स्मृतीचा अभ्यास करण्याने जीवनातील अत्युच्च पद म्हणजे निर्वाण प्राप्‍त करण्यास मदत होते. प्रत्येक क्षणी स्मृतीमान राहिल्याने त्याच्याकडून वाईट कृत्य घडण्याचा शक्यता फारच कमी असते. स्मृती वाईट आणि चांगले जाणत असते. तसेच स्मृती माणसांच्या विकारांना जाणत असते. तृष्णेच्या आहारी जाणारे दु:खाला बळी पडत असतात. मिथ्या आचरण, मिथ्या दृष्टी, मिथ्या वाचा, मिथ्या कर्म याबाबत स्मृती जागृत ठेऊन जीवन जगणारे सुखी व आनंदी राहत असतात.

बुध्दांचा धम्म माणसासाठी असून माणसातील विकारांना नष्ट करुन त्याला एक चांगला माणूस बनविणे हे धम्माचे ध्येय आहे. हे ध्येय तेव्हाच साध्य करता येते जेव्हा तो स्मृतिने युक्‍त असे आचरण करतो.

मज्झिम निकायमध्ये सतिपठान सुत्तामध्ये चार प्रकाराचे स्मृती सांगितल्या आहेत.

१)      कायानुस्मृती, २) वेदनानुस्मृती, ३) चित्तानुस्मृती व ४) धम्मानुस्मृती

या सुत्तामध्ये भगवान बुध्द म्हणतात, ‘भिक्षूंनो, हे जे चार स्मृतीप्रस्थाने आहेत ते स्वत:च्या विशुध्दीसाठी, शोक कष्टाच्या अस्तासाठी, दु:खाला दूर करण्यासाठी, सत्याच्या प्राप्‍तीसाठी, निर्वाणाच्या प्राप्‍ती आणि साक्षात्कारासाठी एक मात्र मार्ग आहे.’ सतिपठानतील सती म्हणजे स्मृती. स्मृतीमध्ये प्रस्थापित होणे, स्मृतीमध्ये राहणे म्हणजेच कायेच्या, वेदनेच्या, चित्ताच्या व धम्माच्या स्मृतीचा सराव करणे होय. या  कायेच्या, वेदनेच्या, चित्ताच्या व धम्माच्या प्रती सतत जागृत राहणे होय. यालाच अनुपस्यना करणे असे म्हणतात. अनु म्हणजे सतत व पस्यना म्हणजे पाहणे, अनुभव घेणे होय.

कायानुस्मृती म्हणजे कायेबद्दल  (काया म्हणजे शरीर) स्मृती ठेवून, आळस सोडून उद्धोगशील, ज्ञानयुक्‍त स्मृतिमान बनून राग, लोभ, मोह व द्वेष यास काढून जागृतीपूर्वक कायेची स्मृती ठेवणे होय. जसे चालतांना चालत आहे, बसतांना बसत आहे, उठत असतांना उठत आहे, झोपलेले असतांना झोपले आहे याची जाणीव ठेवणे होय. रोजच्या जीवनात आपण कायेबद्द्ल अजागृत असलो तर अकुशल कर्म घडु शकतात. म्हणून  कायेबद्दल बाह्यस्वरुपात जागृत असावे लागते. अंतरंगात मात्र श्वासाद्वारे कायेचे जागृती ठेवावी लागते. आपल्या मनात ज्या काही भावना उमटतात, त्यावर शरीर श्वासाद्वारे प्रतिक्रिया देत असतात. जसे राग आल्यास श्वास जोरात चालतो. आनापानसतीमध्ये श्वास आंत घेणे व श्वास बाहेर सोडणे ही क्रिया होत असते. जो एक विपश्यनेचा भाग आहे. विपश्यनेमध्ये श्वास आंत घेणे व श्वास बाहेर सोडणे या क्रियेबद्दल जागृत राहावे लागते. तो श्वासाच्या उदय आणि लयाला जाणतो. श्वासाच्या प्रत्येक संस्काराला जाणतो. शरिराच्या अनित्य स्वभावाला जाणत असतो. शरिरइंद्रियाच्या आसक्‍तीला दूर ठेवतो. जसे आपले डोळे हे इंद्रिय, निसर्गातील एखाद्या सुंदर फुलाकडे आकर्षित झाल्यावर  तो मोहित होतो व ते फुल तोडण्याची क्रिया आपले शरीराच्या हाताद्वारे करीत असतो. आपण जर श्वासाद्वारे स्मृतिमान असलो तर अश्या आसक्‍तीपासून, मी, माझे अश्या अनात्मतेपासून  दुर राहू शकतो. आपण जर सदा स्मृतिमान राहिलो तर आपल्याकडून असे हे अकुशल कर्म घडणार नाही.

वेदनानुस्मृतीमध्ये आपल्या शरिरात इंद्रियाद्वारे वस्तूला स्पर्ष झाला की सुखद, दु:खद व असुखद-अदु:खद अशा संवेदना निर्माण होतात, तेव्हा अशा संवेदनाबाबत जागृत राहाणे होय. विपश्यनेमध्ये आपल्या शरिरातील आतील भागातील वेदनांची स्मृती विपश्यी जागृत ठेवीत असतो. तो वेदनानुस्मृतीचा सराव करीत असतो. वेदनेचा उदय व लय कळल्यानंतर वेदनेच्या कारणास जाणण्याची  क्षमता त्याच्यात निर्माण होते. हे जाणणे प्रज्ञेद्वारे शक्य होते.

चित्तानुपस्सनामध्ये  चित्ताच्या स्वभावाला जाणल्या जाते. चित्त म्हणजे मन आणि विज्ञान (जाणिव) याचे समन्वय होय. काया, वाचा आणि मनाचा अनुभव विज्ञान घेत असते. चित्ताच्या स्मृतीमध्ये इंद्रिय कुशल आणि अकुशल कर्माला जाणत असतो. म्हणजेच चांगले काय आणि वाईट काय हे चित्तस्मृती ओळखत असते व त्याप्रमाणे आपल्या शरिराच्या अवयवाकडून काम करुन घेत असते. चित्त शरीराला आकार देत असते. चित्त ज्या प्रकारचे असेल, त्याप्रमाणे शरीर प्रतिक्रिया देत असते.  चित्तस्मृती लोभ, द्वेष, मोह इत्यादी विकारापासून दूर जाण्यास मदत करते. बर्‍याच वेळा आपला वेळ आळसात, दुसर्‍यांचा द्वेष करण्यात, अस्वस्थतता व शंका-कुशंकामध्ये जात असतो. परंतु चित्त स्मृतीमुळे याचा लय होतो आणि चित्त शुध्द होते. म्हणून चित्ताबाबत  सतत जागृत असणे म्हणजेच स्मृतिमान राहणे अत्यंत आवश्यक आहे.

धम्मानुस्मृतीमध्ये भगवान बुध्दांच्या चार आर्यसत्याच्या शिकवणूकीला जाणतो. तसेच त्यांच्या दु:ख, अनित्य आणि अनात्म या सिध्दांताला जाणतो. नामरुप स्कंधाला व त्याच्या कार्याला जाणतो.

म्हणून सतिपठान सुत्ताच्या या  चार स्मृतीचा नियमीत अभ्यास करुन  आचरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मनुष्य विमुक्तीची अवस्था प्राप्त करु शकतात.

३) सम्यक समाधी

अष्टांगिक मार्गातील आठवा आणि शेवटचा मार्ग सम्यक समाधी हा आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती प्राप्‍त करुन घेण्यासाठी लोभ, द्वेष, आळस, व सुस्ती, संशय आणि अनिश्‍चय हे पांच  अडथळे येत असतात. ते दूर करण्याचा मार्ग म्हणजे सम्यक समाधी हा होय. कोणतेही कार्य करण्यासाठी सम्यक समाधी महत्वाचे कार्य करते.

मनाला स्थायी व कायम स्वरुपाचे वळण सम्यक समाधीद्वारे लावता येते. चित्ताला स्थिर करण्याचे कार्य सम्यक समाधी करतो. सम्यक समाधी मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेचे काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. त्यामुळेच अकुशल कर्माकडे आकर्षित होणार्‍या मनाच्या प्रवृतीला दूर ठेवते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचा़च नेहमीच  विचार करण्याची संवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच  प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.

मिलिंद प्रश्‍नामध्ये समाधीचे गुण सांगितले आहेत. समाधिस्त व्यक्‍ती स्वत: आपला रक्षक बनतो. त्याच्यामध्ये अजेय शक्‍ती निर्माण होते. त्याच्या सर्व अवगुणाचा नाश होतो. सर्व अपयश दुर होतात. यशाची वृध्दी वाढते. संतुष्ट होतो. असंतोषापासून तो दुर राहतो.भयभित होत नाही. आळस राहत नाही, उत्साहित होतो. राग, द्वेश, मोह, गर्वापासून तो दुर राहतो.त्याचा संदेह दुर होतो.त्याचे चित्त स्थिर होते. प्रसन्न राहतो त्याचे चित्त मृदु बनते. गंभिर होतो. त्याला चांगला लाभ  प्राप्‍त होते. आदरनिय बनतो. प्रितिवान बनतो. अप्रमादापासून दुर राहतो. त्याला सर्व संस्काराचे दर्शन होते.पुनर्भव होत नाही.

विपश्यना भावना करणार्‍याला जे अहर्ताचे ज्ञान प्राप्‍त होते ते यथार्थ ज्ञान असते. समाधीमध्ये मनाला आनंद वाटते. सम्यक समाधीमुळे ताबडतोब फळाची प्राप्‍ती होत असते. सम्यक समाधी विद्या आणि ज्ञानाचे सार आहे. योग्यप्रकारे छावलेल्या घरात जसे पाणी शिरत नाही, तसेच समाधिस्त चित्तामध्ये राग, लोभ इत्यादी मनोविकार शिरत नाहीत असे सम्यक समाधीचे फायदे व महत्व धम्मपदामध्ये सांगितले आहे.

मानसिक स्थिरतेसाठी ध्यान-भावनेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ  सम्यक समाधीच बिघडलेल्या चिंतन, मननाला शांत राखू शकते.

पी.नरसु या लेखकाने ‘बौध्द धर्म का सार’ या पुस्तकात दहा प्रकारचे फायदे सागितले आहेत. ते असे-

१.                             जेव्हा माणूस विधीपूर्वक ध्यान-भावनेचा अभ्यास करतो तेव्हा त्याचे सर्व इंद्रिय शांत व गंभीर होतात आणि त्याला हे माहित पण पडत नाही. तो त्यात आनंद घेऊ लागत असतो.

२.                            मैत्री भावना त्याच्या हृदयाला भिडून जात असते आणि तो सर्व प्राण्यावर आपल्या बहिन-भावासारखे प्रेम करीत असतो.

३.                            प्रेमाची आंधळी ईर्षा सारख्या विषारी आवेशाला तो आपल्या चित्तातून हळूहळू काढून टाकतो.

४.                            सर्व इंद्रियांचे निरिक्षण केले जात असल्यामुळे ध्यान-भावना माराच्या आक्रमणापासून सुरक्षित राहते.

५.                           जेव्हा हृदय पवित्र व प्रवृती शांत होत जाते तेव्हा ध्यान-भावना करण्यावर कोणत्याही खालच्या स्तरावरचा आवेश त्याच्यावर आक्रमण करीत नाहीत.

६.                             जेव्हा चित्त वरच्या स्तरावर एकाग्र होतो, तेव्हा तो वर्व प्रकारच्या आकर्षापासून आणखी दुर राहतो.

७.                           जरी चित्त अहंकारापासून दुर राहिला तरी तो ऊच्छेदवादाच्या जाळ्यात गुंतून राहत नाही.

८.                             जीवन-मरणाच्या जंजाळामध्ये कितीही गुंतून असला तरीही त्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसत असतो.

९.                             धम्माच्या खोलात जात असल्यामुळे भगवान बुध्दाच्या शिकवणीनुसार तो आपले जीवन व्यतीत करीत असतो.

१०.                         त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, मोह होत नाही.

ध्यानभावना असा एक अभ्यास आहे की, जो प्रकाशाकडे घेऊन जातो. जगाकडे  त्याला एका नवीन रुपाने पाहण्याची दृष्टी येते. तो आसक्‍तीरहित, रागरहित व द्वेषरहित बनतो. ध्यानभावना हे चित्ताला विकसित करण्याचे एक साधन आहे.

अशा प्रकारे प्रत्येकांने अष्टांग मार्गाचा म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी ह्या सदाचार मार्गाचा अवलंब केल्यास एक माणूस दुसर्‍या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमाणुषपणा यापासून तो दूर राहील.

Tag Cloud

%d bloggers like this: