सिध्दार्थ गौतमाला ज्ञान प्राप्तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असतांना
त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या.
नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते; परंतु ते कसे नाहिसे करावे याचा मार्ग मात्र सांगितला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्न विचारला की, “व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणार्या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ?” त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ?” या दोन्हिही प्रश्नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त गौतम बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.
तथापी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्नात ते म्हणतात की, “चार आर्य सत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? कारण हे चार आर्यसत्य बुध्दांच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.” त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय ? या प्रश्नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ?” भगवान बुध्द दुसर्या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. म्हणूनच त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल ?
सिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दाचे उपदेश या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते. भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजकांना सारनाथ येथे या चार आर्यसत्यांचा उपदेश केला.
भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.
दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे.आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे.
दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख कां होते? त्याला दु:ख कां भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो.
परंतु दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मिच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद हया सिध्दांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही.
तृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.
कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधिही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो.
भवतृष्णा म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी बाळगणे म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किवा पुन:पुन्हा जन्म घेण्याची लालसा. या लालसेमूळे जगाच्या दु:खात मोठी भर पडली आहे. शंभर वर्षे जगूनही मनुष्य अतृप्तच राहतो. मरणाला माणूस भित असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा !
विभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा, प्या आणि मजा करा कारण उद्या मरणारच आहे, अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांध बनतात आणि शेवटी दु:ख ओढवून घेतात.
दु:खनिरोध हे तिसरे आर्यसत्य होय. दु:खनिरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्ती, तृष्णेचा नाश करणे. तृष्णेचा क्षय करणे. ज्याला निर्वाण प्राप्त झाले तो तृष्णेपासून मुक्त होतो. म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मोह राहत नाही. तृष्णेमुळे लोभ निर्माण होते. एखादी गोष्ट त्याला आवडायला लागली की, तो त्यावर आसक्त होतो. तिचा लोभ धरतो. पण तिच गोष्ट त्याला मिळाली नाही की, त्याचा द्वेष करतो. प्रत्येक गोष्ट हे अनित्य असते, असे भगवान बुध्दांनी सांगितले आहे. त्या गोष्टीचे अनित्य असलेले खरे स्वरुप न कळल्यामुळे त्याला मोह किवा भ्रांती होते. अशा तर्हेने तो लोभ, द्वेष, मोहाला बळी पडून दु;ख ओढवून घेतो.
दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चवथे आर्यसत्य होय. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुध्दाची फार महत्वाची शिकवण आहे. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दु:खाचा निरोध करणार्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग. या मार्गानेच दु:खाचा निरोध होऊ शकतो.
जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, “दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा” . तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, “माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल.”
हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणूकीचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेमध्ये केला आहे. अकरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.” बारावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचा अवलंब करीन.” तेरावी ते सतराव्या प्रतिज्ञेमध्ये पंचशिलाचा अंतर्भाव केलेला आहे. तेरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.” चवदावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी चोरी करणार नाही.” पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी व्यभिचार करणार नाही.” सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी खोटे बोलणार नाही.” सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी दारु पिणार नाही.” जेव्हा आपण ह्या प्रतिज्ञा घेतो, तेव्हा आपल्याला अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे. तरच खर्या अर्थाने आपण त्या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो.
अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी याचा अंतर्भाव होतो. अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन भाग पडतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे प्रज्ञा मध्ये येते. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शील मध्ये येतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे समाधी मध्ये येतात.
दहा पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री याचा अंतर्भाव होतो.
अशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व ईतरांना धम्मदीक्षा देऊन मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमीवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेंच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”
टिप:- १.सदर लेख ’भीमरत्न पूणे’ या मासिकात जून २०१० च्या अंकात प्रकाशित झाला.
२.सदर लेख दैनिक लोकनायक, मुंबई दि. २२.०३.२०११ च्या वृतपत्रात प्रकाशित झाला.
Like this:
Like Loading...
Related
Comments on: "भगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’" (1)
धम्म सर्व सामान्य लोकांना समजेल अशा भाषाशैली मध्ये आहो
“धन्यवाद”